जवळपास सर्व महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पाऊस दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत पाऊस होत नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. अशातच आता मोसमी पाऊस सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. सध्या कोकण विभागात हलक्या पावसाला सुरुवात झाली असून, दोन दिवसांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांतही पाऊस जोर धरणार असून, मराठवाडा, विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधारांची शक्यता –
अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाची गुजरातपर्यंत प्रगती झाली आहे. गुरुवारी (१६ जून) मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा ओलांडून मोसमी पाऊस विदर्भातील बहुतांश भागांत दाखल झाला. जवळपास ९९ टक्के महाराष्ट्र मोसमी पावसाने व्यापला असला, तरी प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने मोसमी पावसाच्या सक्रियतेबाबत चिंता व्यक्त होत आहे. अरबी समुद्रातून सध्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवास वाढत आहे. दोन दिवसांत त्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती लक्षात घेता पुढील दोन दिवसांत दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांतील घाट विभागातही काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
राज्यात मागील २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पावसाची हजेरी –
दरम्यान, महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण विभागातील मालवण, वैभववाडी, खालापूर आदी भागांत ४० ते ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कणकवली, सावंतवाडी, मडगाव, पालघर आदी भागांत २० ते ३० मिलिमीटर पाऊस झाला. रत्नागिरी, कल्याण, उल्हासनगर भागातही हलका पाऊस झाला. विदर्भातील अकोल्यात ९० मिलिमीटर, खामगाव, चिखली, पातूर, हिंगणा आदी भागांत २० ते ५० मिलिमीटर पाऊस नोंदिवला गेला. महराठवाड्यातील उदगीर, जळकोट, सोनपेठ, पालम आदी भागांत ४० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस गेल्या चोवीस तासांत झाला.