सातत्याने कडक ऊन सुरू झाले नसले, तरी उन्हाळा बाधून थकवा आणि शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास शहरात मोठय़ा प्रमाणावर होताना दिसू लागला आहे. उन्हामुळे अचानक बेशुद्धावस्था येण्यासारखी लक्षणे दाखवणारा उष्माघात होण्याइतके कडक तापमान अजून दिसत नसले, तरी त्यापासून बचाव करण्यासाठी वेळीच काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.    
गेल्या काही दिवसांमधील विषम हवामान संपून उन्हाचा तडाखा हळूहळू वाढू लागला आहे. सातत्याने कडक तापमान दिसत नसले तरी त्याची झलक आताही पाहायला मिळत आहे. अशा वातावरणात ऊन बाधून त्याचा त्रास होण्याचे प्रमाण मोठे असते. उन्हाचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये सध्या शरीरातील पाणी कमी होणे (डीहायड्रेशन) आणि थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने पाहायला मिळत असल्याचे निरीक्षण डॉ. मंजिरी साबडे यांनी नोंदवले. त्या म्हणाल्या, ‘‘डोळे येण्याचा त्रासही लहान मुलांमध्ये दिसत आहे. ज्यांना उन्हात बाहेर फिरावे लागते त्यांच्यात ‘सन बर्न’सदृश लक्षणेही दिसत आहेत. यात अतिउन्हामुळे चेहऱ्याला आणि त्वचेला खाज सुटते, त्वचा लाल होणे, त्यावर पुरळही उठते. उन्हामुळे नाकातून रक्त येण्याची प्रकृती असलेल्या रुग्णांना घोळणा फुटण्याचा त्रास झालेला बघायला मिळत आहे. उष्माघात होण्याइतके कडक तापमान सध्या दिसत नसले, तरी तापमान वाढत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. ऊन बाधून अचानक बेशुद्ध पडणे, रक्तदाब अचानक कमी होणे अशी लक्षणे उष्माघातात दिसतात. उष्माघातावर त्वरित उपचार न केल्यास तो जिवावर बेतू शकतो.’’  
‘वाढत्या उन्हामुळे बाहेरचे दूषित पाणी पिण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे ‘गॅस्ट्रोएंटरिटिस’ म्हणजे जुलाब आणि उलटय़ा यांचे रुग्णही मोठय़ा प्रमाणावर दिसत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
उष्माघाताचा त्रास प्रामुख्याने एप्रिल ते जून या कालावधीत होतो. हा त्रास टाळण्यासाठी पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. उष्माघाताच्या रुग्णांना औषधोपचारांसाठी त्वरित रुग्णालयात दाखल करावे असेही डॉ. परदेशी यांनी सांगितले.
उष्माघाताची लक्षणे

  • – थकवा, डोकेदुखी
  • – ताप येणे
  • – त्वचा कोरडी पडणे
  • – भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे
  • – रक्तदाब अचानक कमी होणे
  • – मानसिक अस्वास्थ्य
  • – बेशुद्धावस्था

प्रतिबंध कसा करावा?  

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
  • – अधिक तापमानात फार वेळ कष्टाची कामे नकोत.
  • – कष्टाची कामे शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान कमी झाल्यावर करावीत.
  • – उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे टाळावेत.
  • – सैलसर, पांढऱ्या किंवा फिक्या रंगांचे कपडे वापरावेत.
  • – उन्हात काम करताना अधूनमधून सावलीत विश्रांती घ्यावी.
  • – उन्हात फिरताना डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गॉगल जरूर घालावा.
  • – उष्माघात झाल्यासारखे वाटू लागले तर ताबडतोब उपचारांना सुरुवात करावी.

उष्माघातावर उपचार काय?

  • – रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखा, कूलर किंवा वातानुकूलित यंत्रणा सुरू करावी.
  • – रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.
  • – रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्यात भिजवलेल्या कापडी पट्टय़ा ठेवाव्यात.
  • – गरज भासल्यास शिरेवाटे सलाइन द्यावे.
  • – त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णास रुग्णालयात दाखल करावे.