पुणे : उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. आवक कमी झाल्याने बटाटा, घेवडा, मटारच्या दरात वाढ झाली आहे. लसूण, काकडी, फ्लॉवर, गाजर, शेवगा, तोतापूरी कैरीच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (३१ मार्च) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो तोतापूरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा, २ टेम्पो भुईमुग शेंग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ६ ते ७ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ५ ते ६ ट्रक गाजर, मध्यप्रदेश, राजस्थानातून ५ टेम्पो मटार, मध्यप्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा…पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्याचा खर्च किती?
पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कांदा १२५ ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून २५ ट्रक बटाटा अशी आवक झाली.
हेही वाचा…पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी होत आहेत. पालेभाज्यांचे दर टिकून आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिर दीड लाख जुडी, मेथी ६० हजार जुडी अशी आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबिर ८०० ते १५०० रुपये, मेथी १००० ते १५०० रुपये, शेपू ८०० ते १२०० रुपये, कांदापात ८०० ते १५०० रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडई ३०० ते ६०० रुपये, पुदिना ४०० ते ७०० रुपये, अंबाडी ३०० ते ६०० रुपये, मुळा ८०० ते १२०० रुपये, राजगिरा ४०० ते ७०० रुपये, चुका ६०० ते ८०० रुपये, चवळई ३०० ते ६०० रुपये, पालक ८०० ते १५०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.