विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आलेली असताना पुणे मात्र थंड आहे. पुण्याचे कमाल तापमान ३७ अंशांच्या खाली नोंदवले जात आहे. पुण्यात कडक उन्हाळ्याची अखेर जवळ आली असून येत्या आठवडाभरात ढगांच्या गडगडाटात पावसाची शक्यता आहे. या पावसाबरोबरच शहराला पावसाचे वेध लागतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वर्धा येथे पारा ४७.५ अंशांपर्यंत पोहोचला, तर अनेक भागात तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. जळगावसह उत्तर भारतातही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. या तुलनेत पुण्यात मात्र तापमान सरासरीच्या आसपास नोंदवले जात आहे. गेले दोन-तीन दिवस कमाल तापमान ३६-३७ अंशांच्या आसपास कायम होते. पुढील आठवडाभरातही त्यात फार वाढ होण्याची शक्यता नाही. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, या काळात कमाल तापमान जास्तीत जास्त ३७ अंशांपर्यंत वाढेल. याच आठवडय़ाच्या अखेरीस ढगांच्या गडगडाटात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून तापमानात घटच होण्याची शक्यता आहे.
त्यातच मोसमी पाऊस (मान्सून) अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. तो पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून ३० मे पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. याच काळात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाला सुरुवात होते. त्यामुळे आता पुण्यात तापमानात फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. म्हणूनच विदर्भात उष्णतेची लाट आलेली असली, तरी पुण्यातील वातावरण मात्र तुलनेने थंड थंडच राहण्याची शक्यता आहे. सामान्यत: मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पुणे शहरात वादळी पावसाला सुरुवात होते. त्यामुळे आता पुढच्या काळात पुण्यात उष्णतेची लाट अपेक्षित नाही, तसे हवामानही सध्या पाहायला मिळत नाही.

‘पुण्यात सामान्यत: ६ / ७ जूनच्या आसपास मोसमी पावसाचे आगमन होते. तो काही दिवस पुढे-मागे होऊ शकतो. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात वादळी पावसाला सुरुवात होते, परिणामी दुपारच्या तापमानात मोठी घट होते. सध्या आपण याच स्थित्यंतराच्या काळात आहोत. त्यामुळेच उकाडय़ात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. आता पावसाचेच वेध लागले आहेत. त्याचे आगमन दोन-चार दिवस पुढे-मागे झाले तरी आता पावसाची वाट पाहायला हवी.’’
– पुणे वेधशाळा