पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून उकाडा जाणवायला लागला होता, कमाल तापमानात वाढ होऊन ते ३८-३९ अंशांपर्यंत पोहोचले होते, पण पुन्हा वातावरणाची पुन्हा फिरली अन् चित्र बदलले. गुरूवारी दुपारनंतर पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले, काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला. विशेष म्हणजे पुढील चार-पाच दिवसांसाठी पुणे व परिसरात वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. त्यामुळे एप्रिल महिन्यात तरी सलग उन्हाळा अनुभवायला मिळणार, की हे चढउतार असेच राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यात अधिकृतरीत्या उन्हाळ्याची सुरूवात होते. पण पुण्यासाठी आताचे वर्ष त्याला अपवाद ठरले. मार्च महिन्यात बराच काळ तापमानात चढउतार होत राहिले. या काळात पावसानेही मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली. मार्च महिन्याच्या अखेरीस तरी सलग उन्हाळा अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण मार्च महिन्यात उन्हाळा असा जाणवलाच नाही. उत्तर भारतात पश्चिमेकडून वाहणारे थंड वारे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) आणि पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून येणारे आर्द्र वारे यांच्या संयोगामुळे अनेकदा वादळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. काही काळ तापमानात बरीच घटही झालेली अनुभवायला मिळाली. अशा प्रकारे साऱ्या वातावरणात चढउतार सुरूच होते.
आता एप्रिल महिन्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे उकाडा वाढणार असे वाटत होते. मात्र, गुरूवारपासून हवेत पुन्हा बदल झाले. ढगाळ वातावरण आणि वादळी पावसामुळे सारेच चित्र बदलले. गुरूवारीसुद्धा सकाळी उकाडा जाणवला. मात्र, दुपारपासून आकाशात मोठय़ा प्रमाणावर ढगांनी गर्दी केली. पुण्याच्या काही भागात पाऊसही पडला. अशीच स्थिती पुढील काही काळ कायम राहणार आहे, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.
—चौकट—
‘‘पुण्यात सध्या दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती राज्याच्या इतरही भागात आहे. पुढील चार-पाच दिवसांत पुण्यात ढगाळ हवामान कायम राहील. काही भागात वादळी पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागात वादळी पाऊस, त्याचबरोबर गारपीट होण्याचीसुद्धा शक्यता आहे. सध्या उत्तर भारतात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्सेस सक्रिय आहेत. त्यांचा परिणाम म्हणून अतिउत्तरेला हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर उत्तर कोकण व गुजरातच्या आसपास हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागाला बाष्प उपलब्ध होत आहे. हे बाष्प आणि स्थानिक उकाडय़ाचा परिणाम म्हणून वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.’’
– पुणे वेधशाळा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा