पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने बजावलेले समन्स दिल्लीतील पतियाळा न्यायालया मार्फत बजावण्यात येणार आहे. याबाबत पतियाळा न्यायालयाने पुण्यातील विशेष न्यायालयाला सूचना केली आहे.

सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधीं यांच्याविरुद्ध पुण्यातील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाने समन्स बजावले होते. त्यानुसार २३ ऑक्टोबरला स्वतः किंवा वकीलांमार्फत न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले होते. हे समन्स दिल्लीतील पतियाळा न्यायालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यावर पतियाळा न्यायालयाने संबंधित समन्स मुख्य न्यायदंडाधिकारी पतियाळा न्यायालया मार्फत बजावण्यात यावे, अशी सूचना केली आहे, अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी दिली.

हे ही वाचा… पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “

हे ही वाचा… अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळातून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर

या दाव्याची सुनावणी आता आजी-माजी खासदार-आमदार यांच्याविरुद्ध खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होणार आहे. त्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचे समन्स बजावले होते. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याचा दाखला देत सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून, त्यात राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सावरकरांच्या तक्रारीत तथ्य आढळले होते.