राज्यातील ढगाळ स्थिती निवळून कोरडे हवामान झाल्याने तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या विदर्भात उष्णतेची लाट आहे. तीन ते चार दिवस कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही तापमानवाढ होत आहे.

गेल्या आठवडय़ामध्ये बहुतांश ठिकाणी अंशत: ढगाळ स्थिती होती. त्यामुळे विदर्भ वगळता इतरत्र तापमान सरासरीच्या आसपास आले होते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमान कमी झाल्याने उन्हाच्या चटक्यांपासून सुटका झाली होती. मात्र, निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाल्यानंतर सूर्य किरणांचा अडथळा दूर होऊन दोन ते तीन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ सुरू झाली आहे.  विदर्भातील उष्णतेची लाट कायम आहे. या भागात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान चाळिशीच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे.

चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी तापमान

विदर्भातील चंद्रपूर येथे सोमवारी राज्यातीलच नव्हे, तर देशातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथेही तापमानाचा पारा ४५ अंशांपुढे आहे.

अकोला, नागपूर, वर्धा आदी ठिकाणीही कमालीचा उकाडा आहे. मराठवाडय़ात सध्या सरासरीच्या जवळपास तापमान असले, तरी सर्वच ठिकाणी ते ४० ते ४२ अंशांवर आहे. त्यात आणखी वाढीची शक्यता आहे.     मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर आदी ठिकाणी ४२ ते ४३ अंशांवर कमाल तापमानाचा पारा आहे.

पुण्यात ३९.६ अंश तापमान असून, सरासरीच्या तुलनेत ते २.१ अंशांनी अधिक असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात रात्रीच्या किमान तापमानातही वाढ नोंदविण्यात येत आहे.