पिंपरी : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यानंतर आता राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात लक्ष घातले आहे. त्यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन, पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी निधी द्यावा, प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना आयुक्तांना केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली हाेती. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असताना राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची कामे हाेत नाहीत. त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. भाजपच्या माजी नगरसेवकांची कामे तत्काळ हाेतात. भाजप नेत्यांबराेबर महापालिका प्रशासन बैठका घेते. भाजपच्या आमदारांकडून प्रशासनावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे हाेऊ नयेत, यासाठी दबाव आणला जाताे. परंतु, पक्षाकडून काेणी लक्ष देत नसल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. त्यानंतर खासदार सुनेत्रा पवार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधून बैठक घेण्याची सूचना केली. त्यानुसार पवार यांनी पक्षाच्या आयुक्तांंच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहराध्यक्ष याेगेश बहल, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, विनाेद नढे आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.

प्रभागातील अंतर्गत रस्ते, रस्ते रुंदीकरण, जलनि:सारण वाहिन्या, विस्कळीत पाणीपुरवठा, प्रभागात अनेक कामे रखडली आहेत. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशा विविध मागण्या माजी नगरसेवकांनी केल्या. त्यावर कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्त सिंह यांनी दिल्याचे शहराध्यक्ष याेगेश बहल यांनी सांगितले.

पार्थ पवारही शहरात सक्रिय राहणार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्षे राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. अजित पवार यांचा शहरातील सर्व निर्णयांत सहभाग असे. राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेल्यानंतरही अजित पवार यांची ताकद कायम आहे. त्यांचे पुत्र पार्थ यांनी पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळमधून लोकसभेची निवडणूक लढविली. तेथील पराभवानंतरही त्यांचे शहरातील राजकारणात लक्ष होते. परंतु, काही दिवसांपासून त्यांचे लक्ष कमी झाल्याचे दिसून येत आहे.

पक्षाच्या माजी नगरसेवकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. याबाबत त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या हाेत्या. त्या संदर्भात आयुक्तांसाेबत बैठक घेतली. माजी नगरसेवकांची प्रलंबित कामे आयुक्तांकडे दिली आहेत. ती कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितले.