बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी चक्क्याची महादेवाची पिंड साकारली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सकाळी त्या दर्शनाकरिता आल्या होत्या. ट्रस्टतर्फे तब्बल ५१ किलो चक्क्याची पिंड साकारण्यात येत असताना पवार यांनी त्यामध्ये सहभाग घेत आपली सेवा देखील रुजू केली.
सुनेत्रा पवार यांनी चक्क्याचा उपयोग करून सुमारे दहा मिनिटे चक्केश्वर महादेव साकारण्यात सहभाग घेत महाराजांच्या चरणी सेवा अर्पण केली. तसेच आरोग्यसंपन्न महाराष्ट्राकरिता दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील केली. तीन तासात सुमारे ५१ किलो चक्का वापरून ही पिंड साकारण्यात आली असून त्यामध्ये द्राक्षे, विविध फळे, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या, बेल, विविध फुले वापरुन पिंडीवर आकर्षक सजावट करण्यात आली. नंतर चक्क्याचा प्रसाद तयार करुन मंदिरात व सामाजिक संस्थांना वाटप करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, अॅड. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अॅड. रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अॅड.प्रताप परदेशी, अॅड. शिवराज कदम जहागीरदार, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. दत्तभक्त योगेश गोसावी व सोनाली गोसावी यांनी अभिषेक करण्यासाठी दत्तमहाराजांची दीड किलो चांदीची मूर्ती अर्पण केली. गोसावी परिवार व डॉ.मिलिंद भोई यांच्या हस्ते सहकुटुंब माध्यान्य आरती झाली.