पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही प्रचार सुरू केल्याने भाजपचा उमेदवार कोण, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीची तयारी करताना देवधर यांनी ‘पुणेकर’ असल्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने विविध घटकांच्या भेटी त्यांच्याकडून सुरू झाल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक येत्या मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभेसाठी माजी महापौर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांची नावे चर्चेत आहेत. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या कोणीही उमेदवारीचा अधिकृत दावा केला नसला, तरी मुळीक आणि मोहोळ यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे. मोहोळ आणि मुळीक या दोघांनीही नव्या संसद भवनाचे चित्र असलेले फलक लावून उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे संकेत दिले होते.
हेही वाचा… आधार कार्ड अद्ययावत केले का? पुणे जिल्ह्यातील २९ लाख नागरिकांची आधार कार्ड अद्ययावत करणाकडे पाठ
हेही वाचा… पिंपरी महापालिकेच्या १०५ शाळांमध्ये अवघे आठ क्रीडा शिक्षक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे नावही चर्चेत आले. देवधर यांनी पुण्यात लक्ष घालावे, अशी सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना केल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. देवधर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती, पक्षाच्या प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी त्यांच्याकडून सुरू झाल्या असून विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थितीही वाढली आहे. ‘पुणेकर’ असल्याच्या मुद्द्यावर सध्या देवधर यांचा भर आहे.