राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये पोहोचली आहे. तळेगाव येथील जाहीर सभेत मावळचे आमदार सुनील शेळके भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. २०१९ विधानसभेच्या आठवणी सांगत असताना शेळके यांच्या डोळ्यात अश्रू तरळे. शेळके भावूक झाल्याचं बघताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या पाठीवर थाप दिली.
आमदार सुनील शेळके यांनी जनसन्मान यात्रेतील भाषणामध्ये मावळकरांचे आभार मानले. मी पैशांसाठी आणि पदांसाठी काम करत नाही. मी पैशांचा भुकेला नाही. मला सन्मानाची अपेक्षा देखील नाही. मावळमधील जनतेने जो विश्वास दाखवला आहे. या विश्वासावर मी आयुष्यभर प्रामाणिक राहील असं शेळके म्हणाले. भर सभेत सुनील शेळके भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. काही वेळे स्तब्ध झाल्यानंतर सभेसाठी असलेल्या महिलांनी सुनील शेळके यांच्या नावाने घोषणाबाजी केली.
हेही वाचा – अजित पवार असे का म्हणाले, देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उठून शेळके यांच्या पाठीवर थाप दिली. पुढे ते म्हणाले, की आगामी विधानसभेत काय व्हायचं आहे? ते होऊ द्या. पद आणि प्रतिष्ठा महत्वाची नसते. विरोधकांना सांगतो, माझ्यावर लहान- मोठ्यांनी खूप प्रेम केलं आहे. मतदान केलं आहे. ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. पण, काहीजण टीका करतात. आरोप करतात. मला या आरोपांचे काही वाटत नाही. माझे वडील, भाऊ आजही कष्ट करतात. माझी पत्नी माझ्यासोबत आहे, असे शेळके म्हणाले.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना घातला घेराव
मावळमधील जनसन्मान यात्रेच्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घातला. मराठा समाजाच्या मागण्या असलेले निवेदन अजित पवार यांना मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, अशा घोषणा देण्यात आल्या.