पुणे : ‘सैन्यदलाच्या सेवेत असताना माझ्या २३ ठिकाणी बदल्या झाल्या. पहाटेपासूनच घराबाहेर असल्यामुळे मुला-मुलीचे लहानपण पाहिले नाही. अनेकदा आमचे बोलणे देखील होत नसे. कुटुंबाकडे लक्ष देत पत्नीने सर्व काही केल्यामुळे मी देशरक्षणार्थ कार्य करु शकलो’, अशी कृतज्ञ भावना हवाई दलातील एअर मार्शल (निवृत्त) सुनील सोमण यांनी व्यक्त केली.सनई-चौघड्याच्या गजरात, रांगोळी आणि दारावर तोरण लावून मराठमोळ्या पद्धतीने हवाई दलातील एअर मार्शल (निवृत्त) सुनील सोमण या निवृत्त सेनाधिकाऱ्याचा सन्मान करून सैनिक मित्र परिवारातर्फे विजयादशमी साजरी करण्यात आली. पुणेरी पगडी, तिरंगी उपरणे, सन्मानचिन्ह, श्रीफळ, मिठाई असे या सन्मानाचे स्वरुप होते.
सोमण यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास सोमण यांच्या पत्नी रश्मी सोमण, ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ सुभाष मोहिते, किरण पाटोळे, आनंद सराफ, शिरीष मोहिते, विष्णू ठाकूर, नितीन पंडित, कल्याणी सराफ, स्वाती ओतारी, प्रज्ञा काळे या वेळी उपस्थित होत्या. भरत खळदकर यांनी सनई-चौघडावादन केले. सोमण म्हणाले, १९७६ पासून हवाई दलात कार्यरत असताना मी युद्ध सहभाग, तातडीच्या मोहिमा, लढाऊ विमान दलाचे नेतृत्व, नवोदितांना प्रशिक्षण, लष्कराच्या विशेष समितीचे सल्लागार असा प्रदीर्घ सहभाग घेतला. सैनिक मित्र परिवाराने या कार्याची दखल घेत केलेला सन्मान माझ्यासाठी खूप वेगळा आहे.’
© The Indian Express (P) Ltd