Sunil Tatkare Remark on Ajit Pawar Faces BJP Protest in Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने रविवारी (१८ ऑगस्ट) जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे जनसन्मान यात्रा आयोजित केली होती. मात्र या कार्यक्रमासाठी नारायणगावात आलेल्या अजित पवारांना भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, तसेच त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने केली. भाजपाच्या या विरोधामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “कोणीही महायुतीच्या एकतेला गालबोट लावू नये.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांच्या पक्षाने नारायणगावात जनसन्मान यात्रेसह पर्यटन आढावा बैठक देखील बोलावली होती. मात्र या ठिकाणी भाजपा किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो किंवा त्यांचा नामोल्लेखही करण्यात आला नव्हता. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन काळे झेंडे दाखवले. तसेच या बैठकीसाठी भाजपाला निमंत्रण नसल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावर सुनील तटकरे म्हणाले, “मुळात त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचं काही कारण नाही, त्यांनी निदर्शने करण्याची आवश्यकता नव्हती. कारण हा आमच्या पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम आहे.”

हे ही वाचा >> CM Eknath Shinde : “…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

सुनील तटकरे म्हणाले, “माझ्या जिल्ह्यातही भाजपाचे नेते, मंत्री येतात. आम्ही त्यांच्या कार्यक्रमांवर कधीही आक्षेप घेत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कोणी महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम करत असेल तर त्याला सक्त ताकीद दिली पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.” तटकरे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांना सांगण्यात आलं की अजित पवारांनी हा कार्यक्रम घेताना महायुतीतील घटकपक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असं निदर्शने करणारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणत होते. यावर सुनील तटकरे म्हणाले, “त्यांचा विषय सोडून द्या, मला त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही. मी थेट त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलेन.”

हे ही वाचा >> मराठ्यांना देश चालवायचाय, आरक्षण कसले मागता? संभाजी भिडेंचा मराठा समाजाला सवाल

हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम : तटकरे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे पालकमंत्री आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाचे पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या पक्षांचे कार्यक्रम होत असतात. आम्ही कधी त्यावर आक्षेप घेत नाही. तसाच हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. हा कोणत्याही प्रकारचा शासकीय कार्यक्रम नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आहे. त्यामुळे कोणीही गैरसमजातून किंवा राजकीय हेतूने अशी निदर्शने करू नये. घटक पक्षाने अशा प्रकारे काळे झेंडे दाखवू नये.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare reacts on ajit pawar faces bjp protest with black flags in pune asc
Show comments