ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या प्रेरणेतून कलाकारांनी कलाकारांसाठी स्थापन केलेले रसिक मंडळ पुन्हा कार्यान्वित करणार असल्याचे ज्येष्ठ गायिका आणि संगीत शिक्षिका सुनीता खाडिलकर यांनी रविवारी सांगितले.
पुणे भारत गायन समाज संस्थेतर्फे संस्थेच्या अध्यक्षा शैला दातार यांच्या हस्ते सुनीता खाडिलकर यांना माणिक वर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माणिक वर्मा यांची कन्या आणि गायिका राणी वर्मा याप्रसंगी उपस्थित होत्या.
सुनीता खाडिलकर यांनी माणिक वर्मा यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, गुणी गायिका, मोठी बहीण आणि मैत्रिण अशी माणिकची विविध रूपे मी अनुभवली आहेत. नोकरी सोडून त्यांच्याकडून गाणं शिकणं हे माझ्यासाठी शक्य झाले नाही, पण त्यांच्या मैफली भक्तासारख्या श्रवण करून मी खूप काही शिकले. माणिक वर्मा यांच्याच प्रेरणेतून रसिक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. आता हे मंडळ पुन्हा कार्यान्वित करण्याचा मानस असून एक मे रोजी त्यासंदर्भात बैठक होणार आहे.
सुहास दातार यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात शैला दातार यांची शिष्या मधुरा दातार यांचे गायन झाले.