पुणे : सध्याच्या महासंगणकापेक्षा अधिक वेगवान ‘परमशंख’ या महासंगणकाची निर्मिती प्रगत संगणन विकास संस्थेतर्फे (सी-डॅक) करण्यात येत आहे. पुण्यासह बंगळुरू, हैदराबाद आणि त्रिवेंद्रम येथील सुमारे तीनशे शास्त्रज्ञ या महासंगणकाच्या निर्मिती प्रक्रियेत समाविष्ट असून, २०२८पर्यंत भारतीय बनावटीचा हा महासंगणक कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> पुण्याचा वाहतूक कोंडीतही झेंडा! जगातील सातव्या क्रमांकाचे वाहतूक कोंडीचे शहर
सी-डॅक येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी कार्यकारी संचालक कर्नल (निवृत्त) ए. के. नाथ यांनी ही माहिती दिली. ‘सी-डॅक’ने देशातील पहिला महासंगणक ‘परम ८०००’ हा १९९१ मध्ये कार्यान्वित केला. त्यानंतर ‘परम’ महासंगणक उत्तरोत्तर अधिक विकसित करण्यात आला आहे. महासंगणकाच्या संशोधनाला चालना देण्यासाठी ‘राष्ट्रीय महासंगणक मोहीम’ केंद्र सरकारने राबवली. बंगळुरू येथे वीस पेटा प्लॉफ या क्षमतेचा महासंगणक पुढील काही आठवड्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र संशोधनासाठी अधिक क्षमतेच्या महासंगणकाची गरज निर्माण होत असल्याने सध्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचा (एक्सास्केल) महासंगणक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सध्याच्या काळात अमेरिका, जपान, युरोपमध्ये प्रचंड क्षमता असलेले महासंगणक कार्यान्वित आहेत. भारतातही आता ‘एक्झास्केल’ महासंगणकाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे परमशंख हा अधिक वेगवान महासंगणक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत भारतीय बनावटीचे ‘प्रोसेसर’ आणि ‘स्टोरेज’सह स्वदेशी सुटे भाग वापरण्यात येणार आहेत. ‘परमशंख’ या प्रचंड क्षमतावान महासंगणकाची गती त्यापेक्षा हजार पटीने मोठी असून, त्या आधारे संशोधकांना ‘डेटा’चे विश्लेषण अतिवेगाने करणे सुलभ होणार आहे. या महासंगणकामुळे भारत संशोधनाच्या क्षेत्रात मोठी उडी मारू शकतो.