लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी गुन्हे शाखेने आरोपी अरुणकुमार सिंग याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. अपघात प्रकरणात ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे याच्याविरोधातील पुरावे, आरोपींचे जबाब आणि तांत्रिक तपासाबाबतची कागदपत्रे शुक्रवारी पोलिसांनी न्यायालयात सादर केली.

कल्याणीनगर भागात १८ मे २०२४ रोजी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता आणि त्याच्या मैत्रिणीला धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मोटारीत अगरवालच्या मुलाचे मित्र होते. अपघातापूर्वी अगरवालचा मुलगा आणि दोन मित्रांनी मुंढवा भागातील एका पबमध्ये मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले होते. तिघांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना ससून रुग्णालयात नेले होते. त्यावेळी मुलांच्या रक्त नमुन्यात बदल करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.

आणखी वाचा-सेना दिन संचलनानिमित्त येरवडा भागात वाहतूक बदल

रक्त नमुने बदल प्रकरणा विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, अरुणकुमार सिंग यांनी अश्फाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करुन ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे याच्यामार्फत ससूनमधील आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. तावरे यांना लाच दिली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अरुणकुमार सिंगने जामीन मिळवण्यासाटी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर त्याला दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सिंग याच्या सांगण्यावरुन कार्यालयातील कर्मचाऱ्याने आशिष मित्तल याच्या मुलाऐवजी स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले होते. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणात दहा आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असून, अरुणकुमार सिंगविरुद्ध ४७७ पानांचे पुरवणी आरोपपत्र शुक्रवारी पोलिसांनी दाखल केले.

Story img Loader