पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड लिजर लाऊंज (एल थ्री) बारमध्ये झालेल्या बेकायदा पार्टीत मेफेड्रोनचे सेवन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या पथकाने एका तरुणाला मुंबईतील गोरेगावमधून ताब्यात घेतले. पार्टीसाठी त्याने मुंबईतून मेफेड्रोन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

नितीन ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव, मुंबई), करण मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एल थ्री बारमध्ये रविवारी मध्यरात्रीपर्यंत पार्टी सुरू होती. बारमधील प्रसाधनगृहात तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसंनी एल थ्री बारच्या मालकासह आठजणांना अटक केली.

हेही वाचा >>>युजीसीकडून पदव्युत्तर पदवीसाठीचा नवा आराखडा जाहीर… कोणते बदल होणार ?

पार्टीत सामील झालेल्या काही जणांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. मात्र, रक्त तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. तांत्रिक तपास करून पोलिसांनी पार्टीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोघांना मंगळवारी अटक केली. ठोंबरे याला गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली. मिश्राला मुंढव्यातून अटक करण्यात आली. ठोंबरे वास्तूविशारद म्हणून काम करतो. मिश्रा हा एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता दोघे मित्र आहेत. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली

याप्रकरणात पोलिसांनी लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रजनिगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. फ्लॅट नं. ३०२, साईप्रसाद अपार्टमेंट लेन नं. १० मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवी माहेश्वरी (रा. एच १००६, ३८२ पार्क, मॅजेस्टिक, उंड्री), पार्टीचे आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), ध्वनिक्षेपक यंत्रणा सांभाळणारा (डीजे) दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तसेच पार्टीचे आयोजन करणारे रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस मलिक (वय ३३, रा. फ्लॅट नं. ४२, जयजवान नगर, राम मंदिराजवळ, येरवडा) यांना अटक केेली.

हेही वाचा >>>ड्रग्स व्हायरल प्रकरण : फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेलवर पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई

बारमध्ये बेकायदा पार्टीचे आयोजन आरोपी अक्षय कामठे याने केले होते. पार्टीसाठी ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात शुल्क स्वीकारण्यात आले होते. समाज माध्यमात कामठे याने पार्टीची जाहिरात प्रसारित केली होती. पार्टीत सामील झालेल्या ४० ते ४५ जणांची पोलिसांनी चाैकशी केली. पोलिसांनी आठ आरोपींपैकी तिघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच पार्टीत सामील झालेल्या काहीजणांचे रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रक्त तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.

दोघांना पोलीस कोठडी

आरोपी नितीन ठोंबरे मूळचा मुंबईतील गोरेगावचा आहे. पार्टीच्या दिवशी तो मुंबईतून पुण्यात आला. त्याने मुंबईवरून येत असतानाच मेफेड्रोन (एमडी)आणले होते. त्यानंतर त्यांनी पार्टीत मेफेड्रोनचे सेवन केले. एल थ्री बारमध्ये येण्यापूर्वी ठोंबरे आणि त्याचा मित्र मिश्रा यांनी पार्टी केली होती. ठोंबरेकडून पाच ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी दोघांना शनिवारपर्यंत (२९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मद्यालयाच्या मंजूर नकाशात बदल

फर्ग्युसन रस्त्यावरील इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हाॅटेल रेनबोला मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. सध्या रेनबो हाॅटेलचे नाव बदलण्यात आले असून, एल थ्री बार नावाने तेथे व्यवसाय करणात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाहणी केली, तेव्हा परवाना कक्षात गंभीर स्वरूपाचे फेरबदल करण्यात आले आहेत. परवाना कक्षात अंतर्गत बदल करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने परवान्याचे तत्काळ निलंबन करून बार लाखबंद (सील) करण्यात आला. एल थ्री बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली.

‘डान्सफ्लोअर’वर कारवाईचा इशारा

शहरातील काही बार, रेस्टोरंटमध्ये ‘डान्सफ्लोअर’चा परवाना नाही. तेथे मध्यरात्रीपर्यंत पार्टी सुरू असते. डान्सफ्लोअरचा परवाना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळतो. परवाना नसताना डान्सफ्लोअर सुरु ठेवणाऱ्या बार, रेस्टोरंटची माहिती घेण्यात येत आहे. अशा रेस्टोरंट, बारचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

कल्ट पबवर कारवाई

पुण्यातील कल्ट पबचे मालक, व्यवस्थापकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. शनिवारी रात्री अक्षय कामठे याने हडपसरमधील कल्ट पबमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. तेथील पार्टी रात्री साडेबाराच्या सुमारास संपली. पार्टी संपल्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री बारमध्ये मध्यरात्री पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा कामठेने कल्ट पबमध्ये ध्वनीवर्धकावरुन केली. एल थ्री बारमधील पार्टीची माहिती असताना कल्ट पबच्या व्यवस्थापनाने पार्टीबाबतची माहिती पोलिसांना दिली नाही. त्यामुळे कल्ट पबच्या चालकासह, व्यवस्थापकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.