पुण्यामध्ये संशोधनाला समर्पित शैक्षणिक परिसर उभारल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. शैक्षणिक संस्थांनी संशोधनासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे एज्युकेशन फोरमतर्फे ‘उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह-संधी आणि आव्हाने’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात चंद्रकांत पाटील बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, आमदार राहुल कुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि अनिरुद्ध देशपांडे या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालयातर्फे २२ गावांमध्ये टेलिमेडिसिन सेवा ; आयुष मंत्री सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन
पाटील म्हणाले,की राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी संशोधन आणि नावीन्यतेला चालना देणारे अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे. संशोधन आणि नावीन्यतेमुळे संपत्ती निर्माण होते आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. परदेशातून आयात होणारे तंत्रज्ञान आणि साधने आपल्या देशात तयार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व्यवसायाभिमुख, कौशल्य विकासावर आधारित आणि नवकल्पनांना चालना देणारे अभ्यासक्रम राबवावे लागतील.
शैक्षणिक संस्थांमधील ७० टक्के अभ्यासक्रम रोजगार आधारित आणि ३० टक्के विद्यार्थ्याला आवडीच्या विषयातील आनंद देणारे असावेत. पुणे विद्यापीठाने येत्या जूनपर्यंत विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान एकाचवेळी देणारे अभ्यासक्रम सुरू करावेत. यापुढील काळात बहुशाखीय आणि वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.