पुणे : सदतीसाव्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेवर आपली मोहोर उमटविणाऱ्या आफरीन हैदरला पुण्यातील पुनीत बालन ग्रुपच्या वतीने करारबद्ध करण्यात आले आहे. २१ वर्षीय आफरीनने आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार आणि लक्ष्यवेधी कामगिरी करताना तायक्वांदोमध्ये आपला दबदबा निर्माण केला.
श्रीनगर येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकताना आफरीनने तायक्वांदो खेळायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ती मुलांबरोबर सराव करत असे. त्यामुळे तिच्या खेळात एक नैसर्गिक आक्रमकपणा आला. त्यातूनच तिची वाटचाल जिल्हास्तरीय खेळाकडे झाली. तिने अनेक जिल्हा, विभाग स्पर्धा जिंकताना आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर १९ व्या वर्षी नेपाळ येथे झालेल्या जी १ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन तिने कांस्य पदकाची कमाई केली. दिल्ली विद्यापीठाच्या जीजस अँड मेरी महाविद्यालयात आफरीनचे शिक्षण सुरू असून विविध स्पर्धा परीक्षांचीदेखील ती तयारी करत आहे. आफरीन म्हणाली,की कोणत्याही वैयक्तिक खेळ खेळणाऱ्या खेळाडूला अनेकदा आर्थिक बाबींसाठी खूप झगडावे लागते. मीही हा अनुभव घेतला आहे. मात्र, आता पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्यामुळे माझी आर्थिक मदतीची चिंता दूर झाली आहे. त्यामुळे आगामी स्पर्धांमध्ये संपूर्ण क्षमतेने खेळून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आफरीनने स्पष्ट केले.
पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन म्हणाले,की वैयक्तिक खेळांमध्ये आफरीनने आजवर चमकदार कामगिरी बजावली आहे. काश्मीर खोऱ्यातील ही गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविण्यासाठी सक्षम असल्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असेही बालन यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.