राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. माजी आमदार विलास लांडे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स भोसरीमध्ये लावण्यात आले आहेत. २०१९ मध्ये शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे हे तीव्र इच्छुक होते. पण, ऐन वेळी आयात केलेले सध्याचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. त्या वेळी कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता.
हेही वाचा >>> ‘नदीसुधार’साठी एकही झाड तोडू नका! एनजीटीचे पुणे महापालिकेला निर्देश
राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकल्याचे बोलले जात आहे. आज त्यांचा वाढदिवस असून यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीमध्ये भावी खासदार म्हणून फ्लेक्सबाजी केली आहे. विलास लांडे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. परंतु, २०१९ ला शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांची निवड करीत खासदारकीची उमेदवारी दिली होती. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आयात उमेदवारीवरून विलास लांडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा >>> पुणे: महिलेच्या नावे खरेदी केलेली सदनिका कधीही विकता येणार; महिलेलाच सदनिका विक्रीची अट रद्द
आम्ही कोल्हे यांचा प्रचार करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट बोलून दाखवले होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी विलास लांडे यांची समजूत काढून कोल्हे आणि लांडे यांना एकत्र आणले होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी अनेकदा सूचक वक्तव्येदेखील केली. त्यामुळे कोल्हे भाजपात गेलेच तर विलास लांडे हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभेचे उमेदवार होऊ शकतात, असे बोलले जात आहे. म्हणूनच विलास लांडे यांचे समर्थक तयारी करीत असल्याची चर्चा असून विलास लांडे यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकला असेच म्हणावे लागेल.