पुणे / बारामती : उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाहनांचा ताफा मंगळवारी अडविला. पवार यांनी बारामती मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्ते, समर्थकांनी केली. अजित पवार यांनीही समर्थकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती विधानसभेची जागा न लढण्याचे संकेत बारामती येथील मेळाव्यात काही दिवसांपूर्वी दिले होते. ‘मी उमेदवार देईन, त्यालाच निवडून द्या,’ असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले होते. त्यामुळे बारामतीचा उमेदवार कोण असेल, याचबरोबर अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची चाचपणीही पवार यांनी केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बारामती मधूनच निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा ताफा अडविला.

हेही वाचा >>>कंत्राटी शिक्षकांची निवड प्रक्रिया कशी होणार? शिक्षण आयुक्तालयाने दिल्या सूचना…

पवार गेल्या दोन दिवसांपासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामती येथील विविध कार्यक्रम सोमवारी त्यांच्या उपस्थितीत झाले. माळेगाव येथील कार्यक्रमानंतर पवार मंगळवारी बारामती शहराकडे निघाले होते. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले. बारामतीमधूनच निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यासाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पवार गाडीतून खाली उतरले आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम राहिले. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि त्यांची समजूत काढल्यानंतर पवार पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.