‘स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणण्याची महिलांची, नागरिकांची शक्ती लक्षात घेवून त्यातून स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी ‘चेंजमेकर्स’ या लोकल एरिया मॅनेजमेंट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभलेला हा उपक्रम स्पर्धात्मक होता. विजेत्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
यावेळी ‘स्माईल’ च्या संस्थापक, खासदार अॅड.वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, रवींद्र माळवदकर, दर्शना परमार, मकरंद टिल्लू, रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ईश्वर परमार ग्रुप’, ‘संजय कुंभारे ग्रुप’ यांनी या उपक्रमासाठी सहयोग दिले.
सुळे म्हणाल्या की, वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला चेंजमेकर्स हा महिला सबलीकरणाचा हा उपक्रम आगळा वेगळा आणि स्तुत्य आहे. उपक्रमातील सहभागी महिलांनी केलेल्या कामाच्या चित्रफिती पहाताना त्यांच्या कामाचे कर्तृत्व लक्षात येते. या सर्व चित्रफिती पाहून मलाही या महिलांकडून खूप काही शिकायला मिळाले. महिलांमध्ये कायम सातत्य व चिकाटी असते, त्यामुळे
अशा प्रकारचा उपक्रम इथेच न थांबता तो कायम सुरू रहावा व राहील अशी खात्री आहे.
खासदार अॅड. वंदना चव्हाण कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात म्हणाल्या की, स्माईल संस्थेच्या चेंजमेकर्स या लोकल एरिया मॅनेजमेंट उपक्रमाला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात १२५ गटांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये, नागरिकांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढला. स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी महिलांना-नागरिकांना कार्यरत करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होत आहे.
महापौर दत्ता धनकवडे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभलेला चेंजमेकर्स हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. महिलांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन अशाप्रकारे गटाद्वारे उपक्रम केल्यास पुणे शहर बदलायला वेळ लागणार नाही.
या स्पध्रेचे परीक्षण ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक पराग करंदीकर आणि अॅड. वंदना चव्हाण यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शेणई यांनी केले.
स्पध्रेचा निकाल :
प्रथम क्रमांक (विभागून) –
1)जनता वसाहत, वैदुवाडी- वैशाली दारवटकर-रोख पन्नास हजार रूपये
2) अंजली लोखंडे -रोख पन्नास हजार रूपये
द्वितीय क्रमांक (विभागून):
1) पद्मा कांबळे -रोख पंचवीस हजार रूपये
2) राणी खत्री- रोख पंचवीस हजार रूपये
तृतीय क्रमांक (विभागून)
1) नीलिमा पारवडे (गॅस दुरूस्ती)-रोख साडे बारा हजार रूपये
2) सुरेखा भोसले- (दांडेकर पूल) -रोख साडे बारा हजार रूपये
उत्तेजनार्थ प्राजक्ता कलगुंडे , संध्या शिर्के, सुषमा पाचंगे
विशेष पुरस्कार – शैला साठे (शौर्य सुतारदरा), शीतल कुंभार (महिला सक्षमीकरण ), माधुरी कुंभारे (ज्येष्ठ नागरिक)
उल्लेखनीय : नीता तुपारे