पुणे : पुरंदर येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. मात्र या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण या भागातील लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार सुळे यांना वेळेवर देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
पुरंदर उपविभागीय कार्यालयाकडून केवळ चार तास अगोदर या कार्यक्रमाचे निमंत्रण मला देण्यात आले. त्यामुळे इच्छा असूनही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक उशीरा निमंत्रण देण्यात आल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून सुळे यांनी राज्यात सत्ताधारी म्हणून काम करणारे एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस – अजित पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हे सरकार दडपशाही करणारे सरकार असून संविधानाची मूल्य बाजूला ठेवून असे उद्योग केले जात असल्याची टीकाही खासदार सुळे यांनी केली आहे. आपल्या एक्स अकाउंट वर याबाबत पोस्ट करून त्यांनी आपली नाराज व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>>पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत गजाआड, सोलापूर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई
पुरंदर येथे नवीन प्रशासकीय भवन व्हावे, यासाठी माझ्यासह पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी प्रचंड पाठपुरावा केला. या इमारतीचे आज सायंकाळी लोकार्पण होत आहे. याचा अतिशय आनंद आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्याची इच्छा होती. परंतु पुरंदर उपविभागीय कार्यालयाकडून केवळ चार तास अगोदर या कार्यक्रमाचे निमंत्रण मला देण्यात आले. थोडक्यात इच्छा असूनही आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी शासनाची इच्छा दिसते.
आम्ही विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहोत म्हणून तुम्ही आम्हाला निधी देत नाही. विकासकामांना कात्री लावता आणि आता ‘ निती, नियम, निकष’ आणि लोकशाहीतील सगळे संकेत बाजूला ठेवून सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होऊ नये, अशी व्यवस्था करता. असे प्रकार केवळ दडपशाहीत होऊ शकतात. विद्यमान सरकार संविधानाची मूल्ये बाजूला ठेवून दडपशाही करीत आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.