राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पुण्यातील मेट्रोच्या कामात गंभीर तांत्रिक त्रुटी असल्याचा दावा केला आहे. हा दावा करताना त्यांनी अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रांचा आधार घेतला आहे. या सर्व बांधकामाचे ऑडिट करून तांत्रिक चुका दूर कराव्यात, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी काय दावा केला?
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर खात्यावर काही ट्वीट केले आहेत. या ट्वीट्समध्ये त्यांनी वनाज ते गरवारे कॉलेज या मेट्रोच्या मार्गादरम्यान बांधकामाच्या तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगितले आहे. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गादरम्यान बांधकामाच्या काही गंभीर तांत्रिक त्रुटी राहिल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांचे म्हणणे आहे,” असे सुळे म्हणाल्या आहेत.
“या मार्गावरुन भविष्यात लाखो प्रवासी दररोज प्रवास करणार आहेत. त्यांची सुरक्षितता लक्षात घेता या संपूर्ण बांधकामाचे तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करुन या त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. माझी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांना विनंती आहे की कृपया याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी,” अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.