भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना त्यांच्यासारखे नेते माझ्या खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झालेत. चंद्रकांत पाटील यांनी वापरलेली भाषा माझ्या तरी ऐकण्यात किंवा वाचण्यातही नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. त्या पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात गुंडाच्या पत्नीकडून चंद्रकांत पाटील यांचा सत्कार झाल्याच्या घटनेवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “राज्यातील एक वरीष्ठ नेते असे म्हणाले होते. त्यांचं मला एक भाषण आठवतं आहे. साम, दाम, दंड आणि भेद म्हणजे आम्ही काहीही करून कुणालाही विकत घेऊ. त्यामुळे ही तत्त्वाची लढाई नाही, तर फक्त सत्तेची लढाई आहे. त्यामुळे हे एक दुर्दैव आहे. अटलजींच्या काळामध्ये भाजप हा खूप जबाबदार पक्ष होता. त्यावेळी नागरिक अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होते. आज आम्हाला एरवी तत्त्वज्ञान सांगत आहेत आणि तेच आज गुंडांसोबत दिसत असतील, तर ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.”

“केंद्र सरकारने एकाच ठिकाणी रेड टाकण्याचा विक्रम केला”

“शरद पवार मागील आठवड्यात एक गोष्ट म्हणालेत ती खरी आहे. ईडीने एक विक्रम केला आहे. अनिल देशमुख यांच्या घरी ७ वेळा रेड झाली. त्यामुळे केंद्र सरकारने एकाच ठिकाणी रेड टाकण्याचा विक्रम केला असं म्हणावं लागेल. यामध्ये काही तरी वेगळे वाटते, पण पहिल्यांदा काहीच मिळाले नाही,” असं म्हणत त्यांनी ईडीच्या छापेमारीवर टोला लगावला.

“एक आई म्हणून आर्यनवरील कारवाई दुर्दैवी वाटते”

आर्यन खान २६ दिवसांनंतर बाहेर आला. त्या दरम्यान समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील शाब्दिक वाद त्याकडे कसे पाहता असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी एक आई म्हणून सुरुवातीला उत्तर देऊ इच्छिते. नंतर लोकप्रतिनिधी म्हणून बोलते. एक आई म्हणून कुठल्याही आईला हा विषय दुःखाचा विषय आहे. कोणत्याही कुटुंबात झाले असते, तरी ही दुर्दैवाची गोष्ट आहे.”

हेही वाचा : “चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग…”, नवाब मलिकांकडून प्रत्युत्तर

“अधिकारी चुकीचे काम करत असल्यास बॉलिवुड आणि देशाचं नाव जगभरात नाव बदनाम होते”

“त्या मुलाकडे काहीच मिळाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय आहे? त्यामुळे समाज म्हणून आपण सर्वांनी चिंतन केले पाहिजे.केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. एखादा अधिकारी चुकीचे काम करीत असल्यास यामुळे बॉलिवुडचं आणि देशाचं नाव जगभरात नाव बदनाम होते,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

Story img Loader