Supriya Sule on Sunil Tingre: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येताच आता गेल्या काही दिवसांत घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे राजकारण होताना दिसत आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भीषण अपघात झाला होता. एका भरधाव पोर्श गाडीनं दुचाकीला धडक दिल्यामुळं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणानं राज्यात खळबळ माजली होती. अपघातामधील अल्पवयीन आरोपीला अपघाताच्या रात्री आमदार सुनील टिंगरे यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी त्याअनुषंगाने तपासही केला होता. या घटनेवरून आता विरोधकांनी सुनील टिंगरे आणि त्यांच्या गटाला लक्ष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी टिंगरेंवर टीका केल्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे वाभाडे काढत त्यांना थेट खुनी म्हटले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“वडगाव-शेरीच्या लोकांनी तर काहीच बोलू नये. कुठल्या तोडांनं ते मतं मागणार आहेत. त्यांच्या दोन्ही हातांना रक्त लागले आहे रक्त, हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. दोन लोकांचा जीव गेला. त्यांच्या मुलांच्या आईचा दुःखाचा विचार कधी केलात का? त्यांच्या पालकांना काय वाटत असेल. तुम्ही कुणाची बाजू घेत आहात? आरोपीकडे पोर्श गाडी आहे, म्हणून त्यांची बाजू घेता? पैसे आहेत म्हणून त्यांच्या घरी जाता, मी स्वतः त्यांच्याविरोधात प्रचार करून जंग जंग पछाडीन पण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या आईला न्याय देणार”, अशी जाहीर टीका सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर केली.

हे वाचा >> “दिवट्या आमदार…”, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नावाने…”

बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस ठाण्यात गेलात

“मृत मुलांच्या आईचे अश्रू पुसायला कधी गेला नाहीत. पण आरोपीसाठी पोलीस ठाण्यात बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन गेलात. ते पोलीस ठाणे आहे, तुमच्या घरचं डायनिंग टेबल नाही. ही मस्ती घरी जाऊन दाखवा, सर्वसामान्य माणसांसमोर तुमची मस्ती चालणार नाही. पोर्श गाडी कुठल्या पैशानं विकत घेतली देवालाच माहीत. पण पोर्श गाडीनं दोन लोकांचा खून केला. दुचाकीवरून जात होते, म्हणून त्यांचा खून करणार का? अशा प्रवृत्तीला यावेळी घरी पाठविण्याची जबाबदारी वडगाव-शेरीच्या जनतेनं घ्यावी”, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं.

हे ही वाचा >> ‘.. तर मला दोन वेळचं जेवण मिळालं असतं’, मोदींसमोर लाडकी बहीण योजनेवर बोलताना आशा भोसले भावुक

पोर्श अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात कुणी फोन केला? ससून रुग्णालयात रक्त तपासणीवेळी फोन कुणी केला? या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील. एक मुलगी आणि एक मुलगा, घरातले दोन कर्ती मुलं गमावलेल्या आई-वडिलांच्या वतीने मी हे प्रश्न विचारत आहे. ती पोर्श गाडी भरधाव वेगानं चालवली नसती तर आज दोन कुटुंब उध्वस्त झाली नसती, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.