महापालिकेने मृत जनावरांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी मुंढवा येथे जो प्रकल्प प्रस्तावित केला होता त्यातील अडचणी दूर करून त्याला मंजुरी द्यावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांना किमान पन्नास स्मरणपत्रे लिहिली. मात्र, त्यानंतरही त्यांनी या संबंधी कोणताही निर्णय घेतला नाही, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
महापालिकेत सुरू करण्यात आलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेचे उद्घाटन सोमवारी खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर सुनील ऊर्फ बंडू गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, सभागृहनेता सुभाष जगताप, नगरसेविका प्रा. मेधा कुलकर्णी, आयुक्त विकास देशमुख यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा खासदार सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, की मुंढवा येथील प्रकल्पाच्या अडचणी दूर करणे आवश्यक होते. तसेच त्याला राज्य शासनाने मंजुरी देणे व अन्य प्रक्रियाही शासनाने करण्याऐवजी या प्रकल्पाला शासनाने मंजुरी नाकारली आहे. त्यामुळे महापालिकेचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पर्यावरण खात्याने या प्रकल्पाला परवानगी देणे गरजेचे होते. मात्र परवानगी देण्यात आली नाही. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही प्रकल्प सुरू करण्यास नकार दिला आहे. सरकारने यात हस्तक्षेप करून प्रकल्प सुरू होईल यासाठी मार्ग काढावा अशी मागणी करणारी पन्नास स्मरणपत्रे मी मुख्यमंत्र्यांना लिहिली. मात्र, त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.
लोक आमच्यावर नाराज आहेत हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. ते आम्हाला मान्य आहे. आमच्याही काही चुका झाल्या. आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून आगामी विधानसभा निवडणुका आम्ही लढवणार आहोत, असेही सुळे यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांना किमान पन्नास स्मरणपत्रे लिहिली. मात्र, त्यानंतरही त्यांनी या संबंधी कोणताही निर्णय घेतला नाही, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
First published on: 17-06-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule cm criticise pmc