मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निर्णय घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी केली आहे. आता तोच सूर पवार यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आळवला आहे. पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीतील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत. सकारात्मक बोलतात, मात्र फाईल पुढे सरकत नसल्याचे सांगत नेमके घोडे कुठे अडले, ते काही कळत नाही, अशी सूचक टिपणी सुळेंनी पिंपरीत जाहीरपणे केली.
पिंपरीतील एचए कंपनीतील कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही. उत्पादन प्रकिया थांबलेली तर पुनर्वसन योजना रखडली आहे, अशा अनेक दुखण्यांमुळे कंपनी कामगारांचे भवितव्य अंधकारमय आहे. एचए कामगार संघटनेच्या अध्यक्षा या नात्याने सुळे सोमवारी कंपनीत आल्या, तेव्हा त्यांनी कामगारांशी संवाद साधला. कंपनीतील अडचणींची माहिती घेतल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कंपनीला टाळे लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी प्रवेशद्वाराजवळ झालेल्या सभेत दिली. यावेळी सरचिटणीस सुनील पाटसकर, नगरसेवक अमिना पानसरे, अरुण बोऱ्हाडे, सुजाता पालांडे, विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, एचए कंपनीची फाईल दोन-तीन महिन्यांपासून अडकलेली आहे. तीन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले, याविषयी चर्चा केली. ते सकारात्मक बोलतात. मात्र, कृती काही करत नसल्याने फाईल पुढे सरकत नाही. केंद्रीय रसायन राज्यमंत्री श्रीकांत जीना यांच्यासमवेतही चर्चा झाली. मात्र, तेथेही तोच अनुभव आहे. आचारसंहिता लागू होण्यास महिनाभराचा कालावधी राहिला आहे, त्याआधी निर्णय होण्याची गरज आहे. अधिवेशन काळात मुख्यमंत्री दिल्लीत येतील, तेव्हा जीना व त्यांच्यासमवेत चर्चा करण्याचा प्रयत्न राहील, असे त्या म्हणाल्या. कामगार व व्यवस्थापनाने कंपनी जगली पाहिजे, या भावनेने एकत्र आले पाहिजे. कंपनी चालू ठेवण्यासाठी पर्यायी विचार करावा लागणार आहे, त्याची तयारी ठेवली पाहिजे. वेळप्रसंगी बाहेरील तज्ञ बोलावू, त्यांच्या मदतीने कंपनीची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू, एखाद्या कंपनीशी सहकार्य (टायअप) करता येईल का ते पाहू, असे त्या म्हणाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा