वाई : राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंबवडे (ता कोरेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सभेत त्या बोलत होत्या. साताऱ्यातील वाढे फाटा ते आंबवडे चौक या मार्गावर मोठी रॅली काढण्यात आली होती. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेस खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, प्रभाकर देशमुख, प्रदीप विधाते, दीपक पवार, सारंग पाटील, सुभाष शिंदे, संजना जगदाळे, वैशाली शिंदे, तेजस शिंदे, साहिल शिंदे आदिंसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकाची खुर्ची जप्त… काय आहे प्रकरण?

या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कोणाचा कोणाला पायपोस नाही. एक खुश झाला की दुसरा नाराज होतो, कोणाचे आमदार संदर्भ सोडून काहीही बोलतात. कोणाचे आमदार नाराज तर कोणाचे कार्यकर्ते नाराज तर कोणाचे मंत्री नाराज आहेत. सगळीकडे सरकारी अधिकारी, सर्वसामान्यांना दम दिला जातो, कोणाची तोंडे बंद करून गप्प केली जातात. कोणाचे कोणावर नियंत्रण नाही. या सरकारमध्ये शाळा कमी झाल्या अन् दारूची दुकाने वाढली. असं त्यांचं धोरण. देसाई हे आवरा सगळं असं सांगून सुप्रिया सुळे यांनी शंभूराज देसाई यांच्यावरही टीका केली.

महाराष्ट्रातील मराठी माणसांचे हाल दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून केले जात आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचे अधिकार कमी करण्याचे पाप या अदृश्य शक्तीकडून केले जात आहे. या अदृश्य शक्तीला घालवण्याची वेळ आता आली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांच्यावर साताऱ्याने खूप प्रेम केले आहे. हेच प्रेम यापुढेही कायम ठेवावे. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीजास्त आमदार निवडून द्या. शशिकांत शिंदे हे आमदार होणारच आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री राज्यात येणार आहे. कोरेगावचे सध्याचे आमदार महेश शिंदे अधिकाऱ्यांना हाताशी धरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करत आहेत. कोणत्याही लोकप्रतिनिधीची अशी भाषा असेल तर ही संस्कृती आपली नाही. साताऱ्याची तर अजिबात नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी महेश शिंदे यांना दिला.

हेही वाचा – रोहित शर्माने बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या दोन तास आधी अखेर भरला दंड, वाचा नेमकं काय घडलं

कोरेगावातील हुकूमशाही प्रवृत्ती आपल्याला पाडायची आहे आणि ते आपण पाडणारच. ज्या शिवसेनेने यांना तिकीट दिले आणि उभे केले त्या शिवसेनेशी त्यांनी गद्दारी केली आहे. अडचणीत असलेल्या किसन वीर साखर कारखान्याला थकहमी देण्याचा शब्द सरकारने दिला आहे. तो शब्द न पाळल्यास शेतकऱ्यांनी आंदोलन करावे. या आंदोलनात सुप्रिया सुळे तुमच्याबरोबर पुढे असेल असेही त्यांनी नमूद केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने यांची भाषणे झाली. या सभेस परिसरातील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule commented on the political situation in the state svk 88 ssb