पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेला, नेते गेले. प्रेमाने मागितले असते तर सगळे दिले असते. काही अडचण नव्हती. पण, ओरबडण्यात काही मजा नाही, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगाविला. मंत्रीपदाची संधी मलाही होती. पण, निष्ठा महत्वाची आहे. माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडून ठेवायला ताकद लागते, असेही त्या म्हणाल्या.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी मंचर (ता. आंबेगाव) येथे सुप्रिया सुळे यांची सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा…VIDEO : पुण्यातील मूर्ती नसलेले मंदिर पाहिले का? या मंदिरात का नाही मूर्ती; जाणून घ्या कारण
खासदार सुळे म्हणाल्या, की मुलगा किंवा मुलगी दोघेही जबाबदारी आणि कर्तृत्व दाखवू शकतात. लोक मला म्हणतात हे कसे झेलता. एवढ्या घट्ट कशा झाल्या, जबाबदाऱ्या पडल्यानंतर माणूस घट्ट होतो. बाहेर पडल्यानंतर बोलता येते. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पक्ष फुटून दहा महिने झाले, किती दिवस तेच ते करायचे, मी जुन्यामध्ये रमत नाही. माझा काळ मी बदलू शकत नाही. पण, उद्या बदलू शकते. त्यामुळे काय झाले, कोण काय बोलले, कशाला बोलले, यात रमायचे नाही. जबाबदारी स्वीकारायची आणि कामाला लागायचे. दिल्लीतील मोठे लोक राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात भ्रष्ट पार्टी असल्याचे सांगत होते. शरद पवार यांना भटकता आत्मा म्हणत आहेत. आता भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करत नाही.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादीला मुक्त केल्याबद्दल भाजपचे आभार मानते. आत कन्याप्रेमामुळे पक्षात अडचण आल्याचे सांगत आहेत. कन्या प्रेमाचा आरोपाचे मला वाईट वाटत नाही, पण भ्रष्टाचाराच्या आरोपाचे वाईट वाटत होते. पण, त्या आरोपातून भाजपने मुक्त केले. डॉ.अमोल कोल्हे यांनी कांदा आणि बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सोडविला. महायुतीच्या एकाही खासदाराने कांद्याच्या दरबाबत भाष्य केले नाही. कांद्याला हमी भाव मागितल्याने आमचे निलंबन झाले. केंद्र सरकार शेतकरी, कामगार विरोधी आहे. त्यामुळे हे सरकार बदलले पाहिजे. हवा सोडून सर्व गोष्टीवर वस्तू व सेवा कर लादला. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला आहे. शिवाजीराव आढळराव हे आपली शेवटची निवडणूक आहे असे सांगत आहेत. ही त्यांची शेवटची निवडणूक असेल तर पाच वर्षात हे काहीच काम करणार नाहीत. त्यामुळे योग्य उमेदवाराला संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केली.