पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची उपलब्धता होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून दुष्काळी बैठक घेण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाजमाध्यमावरून केली आहे. ही मागणी करताना त्यांनी पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. हा विषय पूर्णपणे पालकमंत्र्यांच्या अखत्यारीतील असल्याने या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे-अजित पवार आमनेसामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – पुणे : वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक, मनसेच्या माजी नगरसेवकासह तिघांवर गुन्हा

गेल्या महिन्यात सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पालकमंत्री पवार यांनी लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून पाण्याचे नियोजन केले आहे. यंदा पाऊस कमी झाला असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातही पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील कालवा समितीची बैठक जानेवारी महिन्यात होणार आहे. या बैठकीतही धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन उन्हाळा संपेपर्यंत केले जाणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत पाणी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे खासदार सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दुष्काळी बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी पालकमंत्री पवार यांच्याकडे न करता थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

image credit – loksatta team/twitter x

हेही वाचा – पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत; घराच्या काचा फोडल्या

खासदार सुळे यांनी काय केली मागणी?

‘बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांत पाण्याचा प्रश्न हळुहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे. या बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे, ही विनंती.’ असे एक्सवरील पोस्टमध्ये खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule direct request to cm eknath shinde regarding drought in baramati pune print news psg 17 ssb