पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यावर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे असतील तर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तुम्ही संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्या विधानातून तुम्ही अजित पवार यांच्यावर थेट आरोप करित आहात का? त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्यावर मोठ्या भावाचा मानसन्मान राखण्याचे संस्कार झाले आहेत आणि मी त्याच संस्कृतीत वाढले आहे. आदरणीय अजित दादा हे माझे मोठे बंधू आहेत. मी अजितदादा विरोधात कधीही भूमिका मांडली नाही आणि मांडणारदेखील नसल्याचे त्या म्हणाल्या.
मागील दहा वर्षांत केंद्रातील भाजपा सरकारने विविध तपास यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष संपविण्याचे काम केले आहे. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा भाषणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नॅचरल करप्ट पार्टी म्हणून उल्लेख केला आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक घटक त्यांच्यासोबत गेला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ‘तो’ उल्लेख करीत नाही. त्यामुळे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रांजळपणे विचारायचे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप राजकीय होते की खोटे होते, की खरे होते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेले आरोप खरे असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. जर आरोप खोटे असतील तर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी भूमिका मांडत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा – पुणे : गणेश विसर्जनासाठी ४० घाटांवर दोनशेहून अधिक कचरावेचक दिमतीला
हेही वाचा – गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; विसर्जन घाटांवर जीवरक्षक तैनात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर केवळ आरोप करून त्यांना जेलमध्ये जावे लागले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली असेल याचा भाजपा नेत्यांनी कधी विचार केला का? त्याहीपेक्षा माझ्या तीन बहिणींचा राजकारणाशी काही संबध नव्हता. तरीदेखील त्यांच्या घरावर असंख्य वेळा छापा टाकण्याचे काम भाजपाने केले आहे. या कारवाईमधून अखेर काहीच समोर आले नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यावर केलेले आरोप हे खोटे होते असे सांगून केंद्र सरकारने माफी मागितली पाहिजे. त्यामुळे आता भाजपाने आत्मचिंतन केले पाहिजे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केली,