राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे. याला सुप्रिया सुळे प्रत्युत्तर देत “होय मला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे,” असं म्हटलं.
सुप्रिया सुळे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. “मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहेत. तर, महाराष्ट्रात छगन भुजबळ, अजित पवार आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार,” अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
हेही वाचा : रेल्वे सुरक्षा निधीचा वापर मसाज मशिन, फर्निचर खरेदीसाठी, सुप्रिया सुळे मोदी सरकारवर संतापल्या; म्हणाल्या….
कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर घराणेशाहीची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे, याबद्दल प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “होय, ही घराणेशाहीच आहे. माझा जन्म ज्या घरात झाला, त्याचा सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार याची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे. आरोप करणाऱ्या पक्षातील घराणेशाही संसदेत आकडेवारीसह दाखवली आहे. त्यामुळे एक बोट माझ्याकडे केल्यावर तीन त्यांच्याकडं असतात.”
हेही वाचा : “…म्हणजे अजूनही ‘मातोश्री’चा धसका कायम आहे,” संजय राऊतांचं अमित शाहांना प्रत्युत्तर
“देशात माझा पहिला क्रमांक येतो, तेव्हा माझे वडिल संसदेत पास करत नाहीत. मला सातत्याने संसदरत्न मिळते, तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही. सोयीप्रमाणे घराणेशाही दिसते,” अशा शब्दांत विरोधकांना सुप्रिया सुळेंनी खडसावलं आहे.