Supriya Sule on Swargate Rape Case : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (३ मार्च) स्वारगेट बस आगाराला भेट दिली. तसेच, जिथे बलात्काराची घटना घडली त्या परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “सरकारची आकडेवारी सांगतेय की गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही वाढलं आहे. आज सकाळी चाकणमध्ये घडलेली घटना देखील धक्कादायक होती. गणवेशात असलेल्या एका पोलिसावर कोयता गँगने हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबर गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता. तिच्याबरोबर सुरक्षेसाठी गणवेशातील पोलीस कर्मचारी होता. तरीदेखील टवाळखोरांच्या टोळीने अशी हिंमत केली. हे अतिशय धक्कादायक, दुर्दैवी व वाईट आहे. मी या घटनांचा निषेध करते”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार सुळे म्हणाल्या, “स्वारगेटमध्ये ज्या प्रकारची घटना घडली ती इथल्या व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. राज्यात अशा घटना सातत्याने घडत आहेत. स्वारगेटला घडलेली घटना पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने हाताळली ते देखील अतिशय असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे. मला या सरकारकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्र्यांना सल्ले दिले आहेत की त्यांच्या मंत्र्यांनी थोडं संवेदनशील वागावं. कारण प्रत्येकाच्या घरात लेकी, सुना आणि मुली आहेत. अशा प्रकारची गलिच्छ घटना घडल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे. असाच सूचना फडणवीसांनी प्रशासनालाही द्यायला हव्यात”.

सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली मोठी मागणी

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “स्वारगेटची घटना ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला गेला ते खूप दुर्दैवी आहे. जिथे ही घटना घडली तिथून मुख्य रस्ता अवघ्या २५ पावलांवर आहे. पोलीस ठाणे देखील जवळच आहे. ही घटना अंधारात किंवा कुठल्यातरी कोपऱ्यात घडली नव्हती. त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली. समाज म्हणून अशा अत्याचाराच्या घटनेचा आपण निषेध केला पाहिजे. मी अनेकदा सत्ताधाऱ्यांना सांगितलं आहे. बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर मी सरकारला व तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की अशा घटनांच्या कारवाईमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने देशासमोर एक उदाहरण घालून द्यावं. या घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणांमधील गुन्हेगारांना भर चौकात फाशी द्यावी अशी माझी मागणी आहे”.