पुणे : ‘खोके देऊन आमदार विकत घेतले म्हणून आता पैशाने मतदार विकत घ्याला का,’ अशी विचारणा करत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपने केलेल्या पैसे वाटपाची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी केली. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्याकडे पाच कोटींची रक्कम सापडते, हे धक्कादायक आहे. सरकार सत्तेवर येत नसल्याचे दिसत असल्यानेच भाजपकडून ही कृती झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्याकडून विरारमध्ये पैशांचे वाटप होत असल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. तावडे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली.
हेही वाचा >>> प्रचाराच्या सांगता सभेतील पत्र आईचेच आहे का? श्रीनिवास पवार यांची अजित पवार यांना विचारणा
‘भाजप पार्टी विथ अ डिफरन्स असे संबोधते. कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतची सत्ता भाजपकडे आहे. त्या पक्षाचे पंतप्रधान आहेत. त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यावर हे आरोप झाले आहेत. सशक्त लोकशाहीच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत घातक आहे. खोके देऊन आमदार विकत घेतले म्हमून पैशाने मतदार विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तावडे यांच्यावरील आरोप खरे असतील तर, त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोग या प्रकरणात न्याय देईल, अशी अपेक्षा आहे,’ असे सुळे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> बारामतीमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारी, युगेंद्र पवार यांच्या ‘शोरूम’ची, तर अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या संस्थेची तपासणी
पंतप्रधानांनी नोटबंदी केली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड येते कोठून. सगळी ठेकेदारी यांच्याकडेच आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा विरारपर्यंत पोहोचतो कसा, हाॅटेलात सापडलेल्या डायरीबाबतचेही स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. हा प्रकार काॅपी करून पास होण्यासारखा असल्याची टीकाही सुळे यांनी केली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला निंदनीय आहे. राज्यात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो. हे सरकारचे अपयश आहे. राज्याचे गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे. या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. – सुप्रिया सुळे, खासदार, बारामती