MVA Protest on Badlapur Rape Case: शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, न्यायालयाने बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलनं केली जातील, असंही स्पष्ट केलं. गेल्या काही काळात उघड झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ ही आंदोलनं केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज पुणे स्थानकाबाहेर शरद पवार गटाच्या नेते-कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळेही उपस्थित होते. सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
“वर्दीची भीती राहिलेलीच नाही”
“संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत. न्याय प्रत्येकासाठी समान असायला हवा. बदलापूर, सातारा, कोल्हापूर, दौंड अशा अनेक घटना गेल्या १५ दिवसांत वाढलेल्या आपण बघतोय. प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे दिसत नाहीये. अनेक घटना पुन्हा पुन्हा झाल्या आहेत. त्याची नोंद पोलिसांनी घेतली नाही म्हणून ही कृत्य वाढली आहेत. वर्दीची भीती राहिलेलीच नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“पुण्यातलीच घटना आहे. इथे पोलीस यंत्रणा रक्ताचे नमुने बदलणं, ड्रग्ज प्रकरणात अटकेतला माणूस पळून जातो अशा अनेक घटना दुर्दैवानं राज्यात आणि पुण्यात होत आहेत”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“..यातून सरकारची विचारसरणी उघड झाली”
“सरकार किती असंवेदनशील आहे बघा. बदलापूरला आंदोलन झालं. सत्तेतल्या लोकांनी असं भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक बाहेरचे होते. ते कुठलेही असोत, ते भारतीय होते आणि भारताच्या लेकीसाठी लढत होते. याची नोंद या सरकारनं घेतली पाहिजे. शेवटी सत्य बाहेर आलंच. तिथलं कुणीही बाहेरचं नव्हतं. ती बदलापूरची सामान्य जनता होती जी त्यांच्या लेकीसाठी लढत होती. यातून सरकारची विचारसरणी काय आहे हे उघड झालं आहे”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुण्यात बलात्कार झालेल्या प्रकरणात दोन महिन्यांत आपण त्या नराधमाला फाशी दिली. असं झालं असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ. प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
Kolkata Rape Case : “मी त्याला भेटले तर विचारेन की…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
“जर सरकारला जमत नसेल तर आपल्या लेकींच्या सुरक्षेसाठी आपण सगळे जबाबदारी घेऊ. मविआचे सगळे पक्ष मिळून ठरवू की सगळे प्रत्येक शाळेत जाऊन तिथे सांगू की काही मदत लागली तर आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. राज्यात कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण आज घेऊ. बदलापूर प्रकरणात आरोपीला फाशी होणार नाही, तोपर्यंत मविआचा कोणताही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. आपण सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागू”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला
दरम्यान, यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना घाईत पीडित मुलींच्या घरी जाऊन त्यांची ओळख उघड करू नये, असं आवाहन केलं. “कार्यकर्त्यांनी घाईघाईत पीडितांच्या घरी जाऊ नये. १५ दिवसांनंतर गेलात तरी चालेल. पण त्यांची ओळख कुठेही उघड होता कामा नये याची काळजी आपण घ्यायला हवी”, असं त्या म्हणाल्या.
© IE Online Media Services (P) Ltd