पुणे : औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात इतिहासकारांनी इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला योग्य तो रस्ता दाखवावा. इतिहासकारांच्या अभ्यासातूनच योग्य काय, अयोग्य काय हे ठरेल. प्रत्येकाची आस्था वेगळी असते. राज्य सरकारने या सर्वांच्या आस्थेचा आदर करावा, अशी भूमिका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात रविवारी मांडली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाली. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध विषयांबाबत भाष्य केले. ‘इतिहासात जरूर रमा. मात्र, त्याचे गलिच्छ राजकारण करू नका. प्रत्येकाचा सन्मान व्हावा, हीच आपली शिकवणूक आहे. त्यामुळे इतिहासकारांना त्यांचे काम करू द्यावे,’असेही सुळे यांनी सांगितले.

‘राज्याच्या कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचार होत आहेत. त्याबाबत अनेकांनी आरोप केले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौहान यांनीही चौकशीचे आश्वासन दिले आहे,’ असे सुळे यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. साखर आणि कृषी समस्यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना येत्या काही दिवसात भेटणार आहे. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे सोयाबीन शंभर टक्के उचलण्यात आलेले नाही. काद्यांवरील करही शून्यावर आणावा, अशी मागणी आहे. मात्र, तीही पूर्ण झालेली नाही. सर्वाधिक खंडणीखोर कोणत्या पक्षात आहेत, याची सर्वांनाच माहिती आहे.

पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, ही जनतेची मागणी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विमानतळाविषयी कोणतीही माहिती नाही. विमानतळ व्हावे, ही सर्वांची इच्छा असल्याने राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

Story img Loader