पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा दोन दिवसांपूर्वी पार पडला. या मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार? असे म्हणत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला होता. यावर अमोल कोल्हे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली असून यावर सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्या टीकेला प्रतिक्रिया देत अमोल कोल्हे यांनी ट्विटर करत उत्तर दिले. कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही, पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की! असं ट्विट करत माझ्या काकांच्या पुण्याईवर मी डॉक्टर, अभिनेता नाही तर स्वकर्तृत्वावर मी माझी ओळख असल्याचे सांगत अमोल कोल्हे यांनी अजित पवार पवार यांना सुनावले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी देखील विधान केले.
हेही वाचा – कल्याण : महागड्या मद्याच्या बाटलांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे दुर्देव आहे. अमोल कोल्हे हे एक अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहेत. अमोल कोल्हे यांचे संसदेतील काम सर्वोत्तम असून त्यांनी मतदारसंघातदेखील खूप विकास कामे केली आहेत. त्यामुळे कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.