पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्र अंतर्गत परीक्षा सुरू आहेत. त्यात अपंग असलेला प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी सूरज मुजावर पायाने लिहून परीक्षा देत आहे. मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राअंतर्गत सूरजने कला शाखेत प्रथम वर्षात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पाणीव येथील श्रीराम शिक्षण महाविद्यालय या अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतला आहे.
दुष्काळी भागातील आर्थिक दुर्बल पार्श्वभूमी असलेला सूरज जन्मतः अपंग आहे. मात्र उच्च शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीने तो मुक्त विद्यापीठाद्वारे शिकत आहे. अपंगत्वामुळे सूरजला परीक्षेसाठी वाढीव वेळ, स्वतंत्र लेखनिक, वेगळा परीक्षा वर्ग देणे या सवलती देण्याची विद्यापीठाची तयारी असूनही तो सर्वसामान्य मुलांबरोबर स्वतः पायाने लेखन करून परीक्षा देत आहे. परीक्षेच्या कालावधीत सूरजला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा…Pune Porsche Crash : रक्ततपासणीवेळी डॉक्टर आणि आरोपीच्या वडिलांमध्ये १४ वेळा संभाषण
मुक्त विद्यापीठामुळे माझी उच्च शिक्षण पूर्ण करण्याची स्वप्न साकार होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. विद्यापीठाकडून सर्व सहकार्य मिळत आहे, असल्याची भावना सूरजने व्यक्त केली.
हेही वाचा…मावळ : पनवेल, चिंचवडचा कल निर्णायक?
अपंगत्व असलेला सूरज मुजावर हा विद्यार्थी कोणाचीही मदत न घेता पायाने लेखन करून परीक्षा देत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. त्याला सर्वतोपरी मदत करण्याची विद्यापीठाची भूमिका आहे.– डॉ. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ