काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले खासदार सुरेश कलमाडी यांचे काँग्रेस भवनातील छायाचित्र अखेर काढण्यात आले आहे. त्या बरोबरच महापालिकेतील उपमहापौर कार्यालय आणि काँग्रेसचे कार्यालय या ठिकाणी असलेले कलमाडी यांचे छायाचित्रही काढण्यात आले असून त्या जागी आता पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धाच्या भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेसने कलमाडी यांना निलंबित केल्यानंतरही त्यांचे छायाचित्र काँग्रेस भवन तसेच महापालिकेतील काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये होते. मध्यंतरी महापालिकेतील एका कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयातच पत्रकार परिषदही घेतली होती. कलमाडी यांनी आयोजित केलेल्या पुणे फेस्टिव्हलमध्ये गेल्या वर्षी तसेच यंदाही काँग्रेसच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
मॅरेथॉन भवनमध्ये गेल्या शनिवारी कलमाडी यांनी बोलावलेल्या झोपडपट्टी वासियांच्या मेळाव्यात कलमाडी आणि काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यात वादंग झाला. त्यानंतर कलमाडी यांची छायाचित्रे काढण्याची मागणी मानकर यांनी केली होती. पाठोपाठ कलमाडी यांनी ‘या वादात मला अजिबात रस नाही. कार्यालयातून माझे छायाचित्र काढावे. मी पुणेकरांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे छायाचित्र काढल्यामुळे वा ठेवल्यामुळे फरक पडणार नाही,’ असे जाहीर केले. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कलमाडी यांची छायाचित्रे काढून तेथे राहुल गांधी यांची छायाचित्रे लावली आहेत.

Story img Loader