‘माळढोकचे अस्तित्व अतिशय धोक्यात असून पक्षी संवर्धनात त्याला महत्त्व देणे गरजेचे आहे,’ असे मत गुजरात येथील ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’चे पक्षीतज्ज्ञ देवेश गाधवी यांनी व्यक्त केले. माळढोक संवर्धनासाठी गुजरातमध्ये करण्यात आलेल्या प्रयत्नांचा प्रवासही त्यांनी उलगडला.
गाधवी यांच्यासह ‘शिरपूर पॅटर्न’साठी ओळखले जाणारे जलसंवर्धन तज्ज्ञ सुरेश खानापूरकर, ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक अभिजित घोरपडे आणि आंध्र प्रदेश येथील शिक्षक डॉ. भारत भूषण यांना वसुंधरा पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या चारही तज्ज्ञांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गुजरातमधील माळढोक संवर्धनाची कथा गाधवी यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘‘देशात आढळणाऱ्या माळढोकांची दुसऱ्या क्रमांकाची संख्या गुजरातच्या कच्छमधील अवसाडा तालुक्यात आहे. या ठिकाणी माळढोकांच्या संरक्षणासाठी दोन चौरस किलोमीटरचे अभयारण्य आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ लहान असल्यामुळे येथील माळढोक अभयारण्याच्या बाहेर असंरक्षित क्षेत्रातच अधिक आढळतात. त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. २०१० मध्ये आम्ही माळढोकाबद्दल तीन वर्षांचा एक अभ्यास केला आणि मूळ अभयारण्याच्या जवळ माळढोक संरक्षणासाठी फायदेशीर ठरेल असे १४ चौरस किलोमीटरचे क्षेत्र निश्चित केले. त्यानंतर शासनाने वनखात्याला या अभयारण्यासाठी १५ चौरस किलोमीटरचा भूभाग देऊ केला असून त्यामुळे माळढोक अभयारण्याचे क्षेत्रफळ १७ चौरस किलोमीटर झाले आहे.’’
माळढोक संवर्धनाचे महत्त्व स्थानिकांना जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत ते संवर्धनात रस दाखवत नाही, असेही गाधवी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘गुजरातमधील पर्यटनाचा माळढोक संवर्धनाला हातभारच लागला. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळत असल्याने त्यांनाही माळढोक संवर्धनात रस आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत माळढोकांचा विणीचा हंगाम असल्यामुळे या काळात मात्र पर्यटक व छायाचित्रकारांना या भागात प्रवेश बंदी केली जाते.’’
दिसला नाला की बांध बंधारा, हे जलसंधारण नव्हे
सुरेश खानापूरकर
पावसाचा आणि पाणीटंचाईचा संबंध नसून उपलब्ध पाणी जिरवण्यात आलेले अपयश हे त्याचे कारण असल्याचे मत खानापूरकर यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘बंधारे ही राज्याच्या जलसंधारणातील मोठी चूक आहे. दिसला नाला की बांध बंधारा, हे जलसंधारण नव्हे. गेल्या तीस वर्षांत पावसात बदल झाला आहे. मुसळधार पण कमी वेळासाठी पडणाऱ्या पावसाने पाणी जमिनीत मुरत नाही. एकाच गावात एका ठिकाणी पाऊस पडतो तर दुसऱ्या ठिकाणी पडत नाही. दोनेक वर्षे दुष्काळ पडतो आणि त्याच्या पुढच्या वर्षी महापूरच येतो. अशा स्थितीत जिथे पाणी मुरते त्या दगड-मातीचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे. पाणी टंचाईचा आणि कमी पावसाचा संबंध नसून आपण पाणी किती जिरवतो ते महत्त्वाचे आहे. शिरपूरला आम्ही तीन वर्षांचे पाणी साठवण्याचा प्रयत्न केला. राज्यात टँकर एका वर्षांत पूर्णपणे बंद करणे शक्य आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा