भारतामध्ये महासत्ता होण्याची क्षमता आहे. पण, क्षमता म्हणजे वास्तव नव्हे. पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यावर दिलेला भर आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) उत्पादनाचा वाटा वाढविणे, या क्षमतांचे वास्तवामध्ये रूपांतर करण्याच्या कालबद्ध धोरणातूनच भारत महासत्ता होऊ शकेल, असा विश्वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी व्यक्त केला.
सिम्बायोसिस संस्थेतर्फे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या व्याख्यानमालेत सुरेश प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान सचिव डॉ. विद्या येरवडेकर आणि सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक प्रा. आर. रमण या वेळी उपस्थित होते.
आपल्यातील क्षमतांचा शोध हा शिक्षणाचा उद्देश आहे. आपल्या क्षमतांचा विकास करून त्याआधारे देशाची प्रगती साधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे सांगून प्रभू म्हणाले, २००८ मध्ये जागतिक मंदीच्या फे ऱ्यामध्येही देशाचा विकासदर साडेसात टक्के होता. राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा घटला असून सेवा क्षेत्राचे योगदान मोठे आहे. मात्र, जलदगतीने विकास साधण्यासाठी उत्पादन क्षेत्राचा वाटा वाढण्याची आवश्यकता आहे. हे साध्य करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’ अभियान सुरू केले आहे. उत्पादन क्षेत्राला गती मिळाली तर, सामान्यांना रोजगार मिळू शकेल. कौशल्य विकसनासाठी केंद्र सरकारने ४० कोटी लोकसंख्येसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. गेल्या ७-८ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था २०० अब्ज डॉलर्स झाली असून क्षमतांचे वास्तवामध्ये रूपांतर केल्यास २ हजार अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट देखील गाठणे सहज शक्य होणार आहे.भारताचा विकास होत असताना शेजारील राष्ट्रेही विकसित होणार आहेत.
प्रादेशिक असमतोल दूर करून आर्थिक-सामाजिक विकास करणारी रेल्वे ही देशाच्या विकासाचे इंजिन ठरली आहे. आगामी पाच वर्षांत १२० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ‘रेल बढे देश बढे’ हे ब्रीद घेऊन रेल्वे सामान्य माणसांपर्यंत पोहोचणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. डॉ. मुजुमदार यांनी प्रास्ताविक केले. विद्या येरवडेकर यांनी आभार मानले.

Story img Loader