‘रेल्वे ही देशाच्या विकासाचे साधन आहे. मात्र, आपल्याकडे सध्या क्षमतेपेक्षा रेल्वेसेवेवर दीडशेपटीने जास्त ताण आहे म्हणून अडचणी आहेत. आपल्याकडे रस्ते वाहतुकीत मोठी गुंतवणूक झाली. मात्र, गेल्या साठ वर्षांत रेल्वेमध्ये गुंतवणूक झाली नाही. विकासासाठी रेल्वेमधील गुंतवणूक दुप्पट होणे गरजेचे आहे,’ असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी व्यक्त केले.
सप महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ‘रेल्वे आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर प्रभू बोलत होते. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय दाढे, अ‍ॅड. जयंत शाळिग्राम, जयवंत मंत्री, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ आदी उपस्थित होते.
‘यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात आश्वासन देऊन अंमलबजावणीच्या पातळीवर प्रकल्प अर्धवट सोडल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे,’ अशी टीका करतानाच रेल्वेबाबतच्या नव्या योजनांची माहिती प्रभू यांनी दिली. ते म्हणाले, ‘मालगाडय़ांना सध्या काही निश्चित वेळापत्रकच नाही. त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर आणि उत्पन्नावरही झाला आहे. त्यामुळे मालगाडय़ांसाठी वेगळे रूळ आखले जातील. त्याचप्रमाणे एकेरी रुळांच्या जागी बहुमार्ग विकसित केले जातील. रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेचा वापर वाढवला जाईल. त्याचप्रमाणे रेल्वेस्थानकांवर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. अर्थसंकल्पापासून आतापर्यंत आधीच्या आणि आताच्या ६७ घोषणांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी वर्षभराचे नियोजन न करता पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, पाच वर्षांनंतरही हे काम पुढे जावे यासाठी प्रशासकीय सुधारणाही करण्यात येत आहेत. रेल्वेचे व्यावहारिक निर्णय, निविदा प्रक्रिया यांबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार हे मंत्र्यांऐवजी प्रशासनाला देण्यात आले आहेत.’
मंत्र्यांना प्रभूंकडून घरचा अहेर
‘आता दिवस बदलले आहेत. अभ्यास न करता परीक्षेला बसता येते. परीक्षेला न बसता उत्तीर्ण होता येते आणि उत्तीर्ण न होता पदवीही घरी बसून घेता येते. अशी शिक्षणपद्धती आता बदलली आहे,’ असा टोला प्रभू यांनी नमोल्लेख टाळून राज्यातील मंत्र्यांना लगावला.
शि.प्र.मंडळी माटुंगा रेल्वेस्थानक दत्तक घेणार
शि.प्र. मंडळी संस्थेची मुंबईतील तीनही महाविद्यालये माटुंगा रेल्वेस्थानकाच्या क्षेत्रात आहेत. त्यामुळे या रेल्वेस्थानकाच्या देखभालीची जबाबदारी उचलण्याची इच्छा संस्थेने प्रभू यांच्याकडे व्यक्त केली असून त्याबाबत लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे प्रभू म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा