एखादे पद मिळण्यासाठी आडनावाचा अडथळा ठरू शकतो का आणि ते पद महापौरपदासारखे मानाचे असेल तर? िपपरीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक रामदास बोकड यांच्याविषयी पक्षवर्तुळात दबक्या आवाजात तशीच चर्चा सुरू आहे. बोकड हे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत, हा त्यांच्या महापौर होण्यात मोठा अडथळा आहे. त्याचबरोबर, त्यांचे आडनाव हेही एक कारण असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. बोकड महापौर झाल्यास आडनावामुळे पदाची टिंगलटवाळी होईल, अशी धास्ती पक्षात असून याबाबतची चर्चा ‘कारभारी’ अजित पवार यांच्या उपस्थितीतही झाल्याचे सांगण्यात येते.
िपपरीत महापौरपदासाठी अनुसूचित जमातींचे आरक्षण असून या संवर्गातील केवळ तीन नगरसेवक पालिकेत असून तिघेही सत्ताधारी राष्ट्रवादीचेच आहेत. त्यापैकी धराडे यांना प्रथम संधी मिळाली. मुदत संपल्याने राजीनामा देऊन त्यांनी इतरांना संधी द्यावी, यासाठी त्यांच्यावर पक्षात वाढता दबाव आहे. आशा सुपे आणि रामदास बोकड हे दोनच पर्याय सत्ताधाऱ्यांकडे आहेत. राष्ट्रवादीशी ‘तळ्यात-मळ्यात’ खेळ करणाऱ्या विलास लांडे यांच्या सुपे समर्थक आहेत. पक्षाच्या ३२ नगरसेवकांनी अजितदादांकडे सुपेंना महापौर करण्याची मागणी करूनही त्यांच्या नावाला अजितदादांनी हिरवा कंदील दिला नाही. शेवटचा पर्याय असलेले बोकड भाजप आमदार जगतापांचे समर्थक आहेत. िपपळे गुरवमधून बोकड बिनविरोध निवडून आले आहेत. बोकड महापौर झाल्यास जगतापांना राजकीय फायदा मिळेल आणि राष्ट्रवादीत अजूनही त्यांचेच चालते, असा वेगळाच संदेश जाईल, अशी धास्ती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. याशिवाय, त्यांच्या आडनावामुळे महापौरपदाची खिल्ली उडवली जाईल, वेळोवेळी अवघडल्यासारखी परिस्थिती होईल, अशी पक्षातील अनेकांची भावना आहे. बोकड यांचा इशारा, बोकड यांचा संताप, बोकड परदेशवारीला अशा स्वरूपाच्या बातम्या पेपरला येतील, अशी उदाहरणे देत या मुद्दय़ांवरून काही स्थानिक नेत्यांची कारभाऱ्यांशी चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते. तथापि, याविषयी जाहीर चर्चा न करण्याच्या सूचना असल्याने कोणीही या विषयावर भाष्य करत नाहीत.
‘आडनावाचा मुद्दाच नाही’
आडनावामुळे महापौरपद मिळत नाही, असे आपल्याला वाटत नाही. अशाप्रकारची इतरही आडनावे असतात. आडनाव काय असावे, हे आपल्या हातात नसते, अशी प्रतिक्रिया रामदास बोकड यांनी दिली. अजितदादा जेव्हा-जेव्हा शहरात आले, तेव्हा त्यांना भेटून महापौरपद देण्याविषयी विनंती केली. ते त्यावर भाष्य करत नाही. आमच्या समाजाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, सर्व आदेश पाळले, याचा विचार करून उर्वरित काळासाठी महापौरपदाची संधी मिळायला हवी, असे बोकड म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा