पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत असलेल्या जैववैविधता उद्यान (बीडीपी) तसेच डोंगरमाथा आणि डोंगर उतार यावर झालेली बांधकामे नक्की किती, याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डोंगरमाथा, डोंगर उतार तसेच बीडीपीच्या आरक्षाबाबत सरकारकडे आलेल्या प्रस्तावांचा अभ्यास करून झा यांच्या नेतृत्वाखालील समिती अभिप्राय देणार आहे. समितीला एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. समितीचे सदस्य सचिवपदाची जबाबदारी महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे असून, त्यांच्या माध्यमातून समितीची बैठक घेतली जात आहे.
महापालिका आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त, नगररचना उपसंचालक असे या समितीचे सदस्य आहेत. या बैठकीत शहराच्या, तसेच पीएमआरडीएच्या हद्दीत असलेल्या बीडीपीच्या आरक्षणामध्ये तसेच डोंगरमाथा, उतार यावर किती बांधकामे झाली आहेत, त्यांची सद्य:स्थिती काय आहे, याची पाहणी करण्यासाठी या भागांतील बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
आमदार, खासदार यांच्यासह वास्तुविशारदांची मते जाणून घेणार समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश नसल्याची तक्रार केली जात होती. त्यामुळे महापालिका आणि पीएमआरडीए हद्दीतील खासदार आणि आमदार यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. काही वास्तुविशारदांची मतेदेखील घेण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच, या आरक्षणाबाबत न्यायालयात काही तक्रारी, प्रकरणे दाखल आहेत. याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय या समितीच्या बैठकीत घेण्यात आला.