भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आलेल्या भारतीय भाषांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. अभ्यास आणि संशोधनाच्या आधारे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार देशभरात ९७० तर, महाराष्ट्रामध्ये ६० बोली भाषा अस्तित्वात आहेत. या अभ्यासाच्या मराठी अहवालाचे प्रकाशन जूनमध्ये होत आहे.
ब्रिटिश राजवटीमध्ये जॉर्ज ग्रीअर्सन यांनी भारतीय भाषांचा अभ्यास केला होता. त्यासाठी त्यांना ३० वर्षांचा कालावधी लागला. १९२० मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला त्यावेळी ग्रीअर्सन ८५ वर्षांचे होते. अर्थात पाकिस्तान, बांगलादेश, कंदहार, भूतान हा भारताचाच भूभाग असल्यामुळे या सर्वेक्षणाला हा वेळ लागला. त्यानंतर गेल्या नऊ दशकांत अशा स्वरूपाचे सर्वेक्षण झाले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना झाली. मराठीसाठी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. सर्व राज्ये भाषेमुळे ओळखली जाऊ लागली. त्यामुळे भाषा सर्वेक्षणाचे काम गरजेचे झाले आणि बडोदा येथील ‘भाषा’ (भाषा रीसर्च अँड पब्लिकेशन सेंटर) या संस्थेने हे कार्य हाती घेतले. तौलनिक भाषांचे संशोधक डॉ. गणेश देवी हे या संस्थेचे अध्यक्ष असून या प्रकल्पासाठी डॉ. डी. पी. पट्टनायक, के. के. चक्रवर्ती आणि डॉ. शिव विश्वनाथन हे निमंत्रक आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या डॉ. महाश्वेता देवी आणि नारायणभाई देसाई हे सल्लागार आहेत. महाराष्ट्रासाठी अरुण जाखडे हे संपादक आणि समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.
राज्यातील प्रमाण भाषा, बोली भाषा, आदिवासींच्या भाषा आणि भटक्या-विमुक्तांच्या भाषा अशा चार स्तरांवर या भाषांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अस्तित्वातील भाषा, संकटग्रस्त असलेल्या भाषा आणि किंचित अस्तित्व दाखविणाऱ्या भाषा असे या सर्वेक्षणाचे स्वरूप आहे. ज्या भाषांसाठी राज्य आहे त्यांची माहिती एखाद्या विशिष्ट राज्याच्या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट नाही. भाषेच्या नावाने साहित्य अकादमी अस्तित्वात असल्याने आणि ज्ञानपीठ पुरस्कारविजेते असल्यामुळे सिंधी आणि ऊर्दू या भाषांचा यामध्ये समावेश आहे. लिपी नसल्यामुळे साहित्य निर्मिती होऊ न शकलेल्या काही भाषादेखील अस्तित्वात आहेत. मराठीमध्ये ६० बोली अस्तित्वात असल्या तरी केवळ मराठी आणि गोंडी या दोन भाषांमध्येच लिपी अस्तित्वात आहे, अशी माहिती अरुण जाखडे यांनी दिली.
या प्रकल्पाच्या अनुभवांविषयी अरुण जाखडे म्हणाले, छोटय़ा भाषांची माहिती मिळविणे अवघड होते. भाषा बोलली की आपोआप जात कळते. त्यामुळे अनेकजण त्यांच्या मूळ भाषांचा जीवन व्यवहारामध्ये वापर करीत नाहीत. राज्य घटनेनुसार छोटय़ा घटकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. पण, त्यांची संस्कृती आणि भाषांना प्रतिष्ठा मिळाली नाही हे वास्तव समोर आले. सिद्धी जोहर याच्या आक्रमणामुळे सिद्धी भाषा अस्तित्वात होती. ही बोलणारी दोनच कुटुंबे महाराष्ट्रामध्ये आहेत. पण, तेही ही बोली प्रत्यक्षामध्ये बोलत नाहीत. एकीकडे भाषा हा अभिमानाचा विषय झाला असून त्यावरून भाषिक संघर्ष होताना दिसत असले तरी भाषिक वेदनेचा विचार केला जात नाही. सीमावर्ती भागातील लोकांना या वेदनांना सामोरे जावे लागत आहे.
भाषा सर्वेक्षण कशासाठी?
– अस्तित्वात असणाऱ्या बोली आणि इतर भाषांची नक्की माहिती उपलब्ध
– मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी उपयुक्त
– जीवन व्यवहाराची पहिली गोष्ट असलेल्या भाषेची समग्र माहिती
– या अभ्यासामुळे झाले भाषांचे दस्तऐवजीकरण
– विविध विषयांवर भविष्यामध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या ५० खंडांसाठीचा हा पायाभूत प्रकल्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा