शिक्षण विभागाने केलेल्या शाळाबाहय़ मुलांच्या दुसऱ्या सर्वेक्षणाचाही परिणाम प्रत्यक्षात रस्त्यावर राहणाऱ्या, बांधकामावर काम करणाऱ्या मुलांवर झालेलाच नाही. यातील अनेक मुलांनी अद्यापही शाळा पाहिलेली नाही. जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवडय़ात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पुणे, सोलापूर, नगर या तीनही जिल्हय़ांमध्ये मिळून फक्त दीड हजार मुलेच शाळाबाहय़ असल्याचा शिक्षण विभागाचा दावा आहे.
शाळाबाहय़ मुलांच्या जुलैमधील सर्वेक्षणातून फारसे काही पुढे आले नाही. त्यानंतर १५ ते ३१ जानेवारी यादरम्यान करण्यात आलेली पाहणी जुन्याच सर्वेक्षणाची पुनरावृत्ती असल्याची टीका स्वयंसेवी संस्था करत आहेत. जुलैमध्ये झालेल्या सर्वेक्षणात फक्त पुणे जिल्हय़ात दीड हजार विद्यार्थी आढळले होते. पुणे जिल्हय़ात या सर्वेक्षणात १ हजार १६६ शाळाबाहय़ असल्याचे आढळले आहे. या सर्वेक्षणात पुणे विभागात येणारे पुणे, सोलापूर, नगर असे तीन जिल्हे मिळून १ हजार ५०७ विद्यार्थी शाळाबाहय़ असल्याचे समोर आले आहे. सिग्नलवर वस्तू विकणारी, भीक मागणारी मुले, पुण्यातील काही भागांतील बांधकामावरील मजुरांची मुले यांच्यापर्यंत प्रगणक या वेळीही पोहोचले नसल्याचे समोर येत आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणी अनेक मुले भीक मागताना दिसत आहेत. प्रत्येक चौकात किमान ५ ते १० भीक मागणारी मुले आढळून येतात. शहरांत सध्या अनेक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. जिल्हय़ाच्या परिसरात इतरही मजुरी कामे सुरू आहेत, असे असताना नोंद झालेल्या शाळाबाहय़ मुलांच्या संख्येवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.
या सर्वेक्षणात पुणे विभागात येणाऱ्या सोलापूर जिल्हय़ात १०१ आणि नगर जिल्हय़ात २४२ शाळाबाहय़ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. या जिल्हय़ांमध्येही स्थलांतरित मजुरांची संख्या जास्त असूनही शाळाबाहय़ मुलांची नोंद मात्र झालेली नाही. या सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या शाळाबाहय़ मुलांना शाळेत दाखलही करण्यात आले. पुण्यातील दीड हजार मुलांपैकी ३७८ मुलांनाच शाळेत दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणातील मुलेही अद्याप प्रत्यक्षात शाळेत गेलेलीच नाहीत, असा आरोप स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो आहे. मूळ योजनेनुसार शाळाबाहय़ मुलांचे आधार कार्ड काढून त्यांची सरलमध्ये नोंद करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात यातील काहीच अमलात आलेले नाही. या सर्वेक्षणादरम्यान सोलापूर जिल्हय़ातील आढळलेल्या शाळाबाहय़ मुलांमधील ९९ आणि नगर जिल्हय़ातील २४० मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.