‘हिंदूू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग आपण संसदेमध्ये केला नाही, असे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेमध्ये केलेल्या टीकेसंदर्भात स्पष्टीकरण केले. उलट आपले अपयश झाकण्यासाठीच केंद्र सरकार हिंदूू दहशतवाद हा शब्दप्रयोग करीत असल्याचा आरोप शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमधील गृहमंत्र्यांनी ‘हिंदूू दहशतवाद’ असा शब्द वापरल्याने भारताचा दहशतवादविरोधी लढा कमकुमत झाला, असल्याची टीका राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी लोकसभेत केली होती. त्याला उत्तर देताना शिंदे यांनी हा शब्दप्रयोग आपण संसदेमध्ये केला नसल्याचे स्पष्ट केले. जयपूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ‘हिंदूू दहशतवाद’ हा शब्द वापरला होता. मात्र, ‘दहशतवादाला धर्म नसतो’ या भूमिकेतून दुसऱ्याच क्षणी आपण हा शब्द मागे घेतला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची (एनडीए) निष्क्रियता लपविण्याच्या उद्देशातूनच हिंदूू दहशतवाद हा शब्द वापरला गेला, असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर देशाची परिस्थिती बदलली. या घटनेमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढले. संसदेवर, लाल किल्ल्यावर आणि जम्मू-काश्मीर विधानसभेवर हल्ले हे त्याचेच द्योतक आहे. देशात अतिरेकी घुसतात, हल्ले होतात. पण, त्यावर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश येत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली. ‘एनडीए’ सरकारच्या काळातच दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांना हिंमत कशी येते, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.
‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, वर्षभरात एक टक्कादेखील अच्छे दिन आले नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाकीतही त्यांनी नोंदविले.
फाशीचा ‘इव्हेंट’ केला
आपण गृहमंत्री असताना अफजल गुरू आणि अजमल कसाब यांना फाशी जाहीर झाली तेव्हा त्याच्या कार्यवाहीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, याकूब मेमन याच्या फाशीचा केंद्र सरकारने ‘इव्हेंट’ केला, असा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केला.