Sushma Andhare Shivsena Thackeray Candidate for Hadapsar : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. अद्याप महाविकास आघाडी किंवा महायुतीमधील जागावाटप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अशातच पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने (ठाकरे) दावा केला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या मतदारसंघातील त्यांचा उमेदवार देखील जाहीर केला आहे. महाविकास आघाडीत हडपसरची जागा शिवसेना (ठाकरे) लढणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या जागावाटपाआधीच सुषमा अंधारे यांनी उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेचे (ठाकरे) स्थानिक नेते महादेव बाबर येथून निवडणूक लढवतील असं अंधारे यांनी जाहीर केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) चेतन तुपे हे या येथील विद्यमान आमदार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुषमा अंधारे पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाल्या, हडपसरच्या जागेबाबतचा निर्णय झाला आहे. ही जागा शिवसेनेला (ठाकरे) मिळणार आहे. आमचे महादेव बाबर येथून विधानसभेची निवडणूक लढवतील.

पुण्यातील अनेक जागांबाबतचा निर्णय होणं बाकी असल्याचं सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं. पुण्यातील सात ते नऊ जागा शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादीला (शरद पवार) मिळू शकतात. तर, उर्वरित जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील अशी चर्चा आहे.

हे ही वाचा >> Priyanka Gandhi : “महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशेब करणार”, व्हिडीओ शेअर करत प्रियांका गांधींचा महायुतीला इशारा

शरद पवार गटाने दावा सोडला?

हडपसरची जागा सध्या अजित पवार गटाकडे असल्यामुळे या जागेवर शरद पवार गटाने दावा केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा खरंच ठाकरे गटाला सुटली आहे का? याबाबत अजूनही अनेकांच्या मनात साशंकता आहे. तसेच शरद पवार गट ही जागा ठाकरे गटाला सोडण्यास तयार आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आज सायंकाळी तिन्ही पक्षांमधील नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी पुणे हे चर्चेच्या केंद्रस्थानी असेल.

हे ही वााचा >> Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचं राज ठाकरेंना उत्तर, “मी आदिवासी आहे जाळी नसली तरीही…”

विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही जागांवरील गणिते आणि उमेदवारांच्या नावावर सहमती झाली आहे. पण, काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या जागांवरील तिढा सुटल्यानंतर तिन्ही पक्ष आपापले उमेदवारी जाहीर करतील.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात अस्वस्थता

दरम्यान, हडपसरच्या जागेबाबत अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात नाराजी पसरली आहे. अंधारे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा करू नये, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

अंधारे या खूप मोठ्या नेत्या आहेत. त्यांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. जागावाटपाचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील आणि योग्य वेळी तो जाहीर करतील, असा टोलाही जगताप यांनी लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare announced shivsena thackeray candidate for hadapsar assembly constituency asc