राज्यात ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी बुधवारी (१८ ऑक्टोबर) अटक केली. यानंतर यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटीलच्या अटकेवर बोलताना आता बोलणाऱ्याची तोंडं बंद होतील, असं वक्तव्य करत सूचक इशारा दिला. या इशाऱ्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील. हा इशारा आहे की धमकी आहे. तोंडं बंद कराल म्हणजे काय कराल. संपवून टाकाल का? की मलिक, देशमुख आणि राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल. अडकवाल तर कशात अडकवाल. आयुष्यभर संवैधानिक भाषा सांगत आली आहे. आयुष्यभर कायदे आणि कलमं याशिवाय काहीही बोललेले नाही. तुम्ही मला अडकवलं तरी कशात अडकवाल?”

“फडणवीस एका पक्षाचे नेते नाहीत, तर राज्याचे गृहमंत्री”

“देवेंद्र फडणवीस हे विसरत आहेत की, ते एका पक्षाचे नेते नाहीत, तर ते या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. या राज्यातील प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांना त्यांचं आणि माझं काही शत्रुत्व आहे असं का वाटत आहे,” असं सूचक वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं.

“राज्य उत्पादन विभागाचे मंत्री म्हणून जराही जबाबदारी नाही का?”

उत्पादन शुल्क विभागाचे मंत्र्यांवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “नाशिकमध्ये २००-३०० कोटी रुपयांचा ड्रग्जचा कारखाना उभा राहिला याचं त्यांना काहीच वाटत नाही का? राज्य उत्पादन विभागाचे मंत्री म्हणून त्यांची जराही जबाबदारी येत नाही का? सोलापूरमध्येही अशीच एक ड्रग्ज फॅक्टरी उभी राहिली. त्यात त्यांना काहीच विशेष वाटत नाही का? त्यांचं दुर्लक्ष झालं होतं का?”

हेही वाचा : “मी पळालो नाही, मला पळवलं गेलं”; ललित पाटीलच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“माझ्या शिक्षकी पेशातील भाषेत तुम्ही सपशेल नापास”

“जर त्यांचं म्हणणं असेल की, त्यांना यातील काहीच माहिती नव्हतं, तर ते संबंधित विभागाचे मंत्री म्हणून माझ्या शिक्षकी पेशातील भाषेत सपशेल नापास आहेत. त्यांना एटीकेटीही नाही, ते नापास आहेत,” अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare answer warning of devendra fadnavis over lalit patil arrest pbs